उस्मानाबाद : गणेश जाधव उस्मानाबाद शहरातील समर्थ नगर भागात राहणारा कबीर शेख नोकरीसाठी कंबोडिया (Kambodiya) या देशात गेला होता. मात्र, तेथे त्याच्यासोबत असं काही घडलं जे वाचून तुमच्या देखील अंगाचा थरकाप उडेल. कबीरला कंबोडिया या देशात सुमारे वार्षिक 24000 हजार डॉलर एवढा पगार मिळेल, अशा प्रकारच्या जॉबची ऑफर आली. यानंतर जॉबवर रुजू होण्यासाठीची प्रकिया पार पाडून कबीर पुण्याहून बंगळुरू, बंगळुरू ते बॅकांक आणि मग बँकाकहून कंबोडिया असा प्रवास करत या कंपनीत पोहोचला.
ADVERTISEMENT
कंपनीत पोहचताच कबीरला धक्काच बसला
कबीर जेव्हा कंपनीच्या पत्त्यावर पोहोचला ,त्याला ज्या कंपनीची ऑफर आली होती तीथे गेल्यावर वास्तव कंपनी दुसरीच होती. त्याठिकाणची परस्थिती पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्याठिकाणी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण होत होती. कर्मचाऱ्यांना मारहाण होताना पाहून कबीरला धक्काच बसला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे कबिरच्या लक्षात आले.
व्हाट्सएप्पच्या माध्यमाने मित्रांना सांगितली हकीकत
कबीर ज्या कंपनीत पोहोचला त्या कंपनीची भिंत 15 फुट उंच आणि त्याच्यावर तारेचे कुंपण होते. त्याचबरोबर, गेटवरती 30 गार्ड होते. त्यामुळे परत वापस तिथून निघणे हे शक्य नव्हते. कबीरला आपली फसवणूक झाल्याचे जाणवल्यानंतर त्याने स्थानिक उस्मानाबाद शहरातील मित्रांशी व्हाट्सएपच्या मदतीने संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कबीरच्या मित्रांनी आपल्यापरीने सदरील प्रकाराची माहिती स्थानिक राजकीय पदाधिकारी, पत्रकार व उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिली.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी बजावली महत्वाची भूमिका
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून लाईव्ह लोकेशनच्या आधारे संबंधित प्रकाराची माहिती घेऊन खात्री करून वरिष्ठांना सदरील प्रकाराची माहिती तात्काळ दिली .परराष्ट्र मंत्रालयात तातडीने पत्र व्यवहार करून परराष्ट्र मंत्रालयातून स्थानिक कंबोडियन पोलिसांना माहिती देण्यात आली .कबीर आणि त्याच्या सोबत असलेल्या भारतीय तरुणांनी काहीही करून आपल्याला उद्या सकाळी येथून निघायचे आहे असा निर्धार करून तयारी पूर्ण केली.
कबीरला चिनी भाषेचे ज्ञान अवगत असल्याने त्याने तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण हकीकत सांगितली. मंत्रालयतील पाठपुरावा व कबीरचा फोन यामुळे कंबोडियन पोलीस कबीर आणि इतर लोकांच्या मदतीला धावून आले. यावेळी पोलिसांना आपल्या कंपनीतून फोन गेल्याची माहिती त्या ठिकाणच्या कंपनीतील लोकांना समजली आणि त्यांनी सर्वांना पोलिसांना माहिती कोणी दिली याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, पोलीस येण्याची हे सर्व भारतीय वाट पाहत होते आणि त्यांना इतर काहीही गोष्टीत अडकवून वेळ मारून नेत होते.
अखेर कंबोडियन पोलीस कंपनीत पोहचले
अखेर लाईव्ह लोकेशनच्या आधारे कंबोडियन पोलीस कंपनीत पोहोचले आणि त्याठिकाणी त्यांनी कबीर आणि इतर भारतीयांची सुटका केली. अजूनही 15 भारतीय मुले-मुली कंबोडियात अडकली आहेत. भयंकर यातना सहन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय तरुणांना फसवणारे काही एजंट बिहार, बंगालमध्ये काम करत आहेत. कंबोडियातूनही मुलांना फसवून भारतात आणून त्यांच्याकडून हेच काम भारतात करुन घेतलं जात आहे. अशी माहिती कबीरने दिली आहे.
अशी करतात फसवणूक
शादी डॉट कॅाम, जीवनसाथी डॉट कॅाम, डिवोर्सी डॅाट कॉम या लग्नासाठी जोड्या जमवणाऱ्या साईटवर खोटी प्रोफाईल तयार करायची. सुंदर मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरून डाऊनलोड करून घ्यायचे. प्रोफाईलवर जोडायचे आणि यानंतर भारतीयांसोबत चॅटींग सूरू करायची. यामध्ये ज्याची वर्षाची कमाई २० ते २५ लाख रुपये आहे अशा लोकांना फसवून त्यांना पैसे गुंतवण्यास सांगायचे आणि ते पैसे लुटायचे अशा पद्धतीचे काम कबीर आणि त्याच्या सोबत असणार्या ७ भारतीय तरुणांना करण्यास सांगितले, अशी धक्कादायक माहिती कबीरने दिली आहे.
ADVERTISEMENT