बंगळुरू: पुण्यातील एका व्यक्तीने बंगळुरूमध्ये आपल्या पत्नीच्या हत्या केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. पण आता या प्रकरणातील वेगवेगळी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. राकेश खेडकर (वय 36 वर्ष) याने पत्नी गौरी सांब्रेकर (वय 32 वर्ष) हिच्या त्रासाला कंटाळून तिची निर्घृण हत्या केली. पण हत्येनंतर राकेशने भाडेकरू असलेल्या शेजाऱ्यांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
राकेश राजेंद्र खेडेकर असे या आरोपीचे नाव असून, त्याने आपली पत्नी गौरी अनिल सांब्रेकर हिचा 26 मार्चच्या रात्री खून केला. या घटनेनंतर राकेशने भाडेकरूंना सांगितले की, गौरीने आत्महत्या केली आहे. मात्र, पोलिसांनी राकेशला पुण्याजवळील शिरवळ पोलीस स्टेशनजवळ अटक केली. जिथे त्याने आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.
नेमकी घटना काय?
राकेश खेडेकर आणि गौरी सांब्रेकर हे जोडपे मागील एका महिन्यापासून बंगळुरूमध्ये राहत होते. राकेश हिताची सिस्टम्स इंडिया या कंपनीत सिनिअर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होता. इथे तो वर्क-फ्रॉम-होम पद्धतीने काम करत होता. तर दुसरीकडे, गौरीने महाराष्ट्रातील एका खासगी कंपनीतील नोकरी सोडली होती आणि बंगळुरूमध्ये नवीन नोकरीच्या शोधात होती. मात्र, तिला योग्य नोकरी मिळत नव्हती, ज्यामुळे ती राकेशला आपल्या बेरोजगारीसाठी जबाबदार धरत होती. गौरीला महाराष्ट्रात परत यायचे होते, तर राकेशला बंगळुरूमध्येच राहायचे होते. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.
हे ही वाचा>> "ती भांडायची, सर्कीटसारखी वागायची...", पत्नीला मारून सुटकेसमध्ये टाकणाऱ्या आरोपीचे वडील काय म्हणाले?
26 मार्चच्या रात्री राकेश आणि गौरी यांच्यात पुन्हा एकदा तीव्र वाद झाला. रात्रीच्या जेवणापूर्वी झालेल्या या भांडणात राकेशने गौरीला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या गौरीने स्वयंपाकघरातील चाकू राकेशवर फेकला, ज्यामध्ये त्याला किरकोळ जखम झाली. पण याच गोष्टीचा राग डोक्यात ठेवून राकेशच्या त्याच चाकूने गौरीवर थेट हल्ला चढवला.
2-3 वेळा वार करून राकेशने गौरीची हत्या केली. गौरीचा मृत्यू झाल्यानंतर राकेशने तिच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून होता आणि सातत्याने बोलत होता की, "तू माझ्याशी का भांडलीस? तू मला तुझ्या बेरोजगारीसाठी का दोष दिलास? बंगळुरूमध्ये येण्याचा तुला का त्रास झाला?"
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
दरम्यान, खुनानंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका ट्रॉली सूटकेसमध्ये कोंबला आणि तो बाथरूममध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता त्याने घराला कुलूप लावले आणि आपल्या होंडा सिटी कारने पुण्याच्या दिशेने पळ काढला. सायंकाळी 5 ते 5:15 च्या सुमारास त्याने आपल्या इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या भाडेकरू प्रभू सिंग याला फोन करून सांगितले की, "गौरीने आत्महत्या केली आहे, तुम्ही पोलिसांना आणि घरमालकाला कळवा." प्रभू सिंगने ही माहिती घरमालकाला दिली, आणि घरमालकाने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
हे ही वाचा>> Pune : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात सापडला तरूणीचा मृतदेह, पोलीस चौकशीत समोर आली खळबळजनक घटना
पुण्यात पोहोचल्यानंतर राकेशने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतून आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या राकेशची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांचा तपास
दुसरीकडे राकेशच्या वडिलांनी यांनी ससून रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'गौरी ही माझी भाची होती (त्यांच्या बहिणीची मुलगी). आम्ही राकेश आणि गौरीच्या लग्नाला तयार नव्हतो, कारण आम्हाला वाटायचे की गौरी खूप भांडखोर आहे. पण तरीही त्यांनी लग्न केलं होतं."
राकेश खेडेकरने आपल्या पत्नीचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली.
दरम्यान, या घटनेने बंगळुरूमधील खळबळ उडाली आहे. नोकरी आणि आर्थिक तणावामुळे वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणारी ही घटना आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा घटना टाळण्यासाठी जोडप्यांनी एकमेकांशी संवाद साधणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
ADVERTISEMENT
