Vanraj Andekar Murder: पुणे: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची भर चौकात हत्या करण्यात आली. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर कुटुंबातील काही जणांनी घडवून आणली असल्याचं समोर आलं आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून हा खून करण्यात आला असल्याचे देखील प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात वनराजच्या दोन्ही बहिणींना आणि त्यांच्या पतींना म्हणजे वनराजच्या बहिणीसह दाजी, भाच्यासह 10 ते 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
रविवारी (1 सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास वनराज आंदेकर चुलत भावासह इमानदार चौकात उभा होता. यावेळी काही लोकांनी त्याच्यावर गोळीबार केला शिवाय कोयत्यानं देखील वार करण्यात आले. हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा राऊंड फायर केले. वनराजवर गोळीबार करण्यापूर्वी परिसरातील लाईट घालवण्यात आली होती.
हे ही वाचा>> Vanraj Andekar: बहिणींनीच भावाची सुपारी दिली, दाजींनी असा केला वनराजचा गेम... Inside स्टोरी!
आंदेकरच्या घरी काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला. आता या प्रकरणात वनराजचे वडील सूर्यकांत आंदेकर यांनी दाखल केलेली एफआयआर समोर आली आहे. यात वनराजच्या हत्येचा नेमका ट्रीगर पॉईंट काय होता हे लक्षात येईल.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील FIR जसाचा तसा..
गुन्ह्याची हकीकत :- दाखल गुन्ह्यातील मयत इसम हा फिर्यादी सूर्यकांत आंदेकर यांचा मुलगा असून आरोपी क्र. ०१ ही मुलगी, आरोपी क्र. ०२ हा जावई आहे. सदर आरोपींचे दि.०१/०९/२०२४ | रोजी आकाश सुरेश परदेशी याचेशी वाद झाले होते, सदरबाबत तक्रार देणेकरीता ते समर्थ पोलीस स्टेशन येथे आले होते.
सदरवेळी शिवम आंदेकर व वनराज आंदेकर असे पोलीस स्टेशन येथे आले होते. पोलीस स्टेशन येथे आरोपी क्र. ०१ व आरोपी क्र.०२ यांनी आकाश परेदशी यास मारहाण करीत असताना सदरचे भांडण हे शिवम आंदेकर याने सोडवल्याने आरोपी क्र. ०१ हिने वनराज आंदेकर यास, “वनराज आम्ही तुला जगु देणार नाही, तु आमचे मधे आला आहे तू आमचे दुकान पाडण्यास सांगून आमच्या पोटावर पाय देतोस काय, तुला आज पोर बोलावून ठोकतेच." असे म्हणाली.
हे ही वाचा>> Pune Crime: मिनिटात खेळ खल्लास, आरोपी जवळचेच! मोहोळ आणि आंदेकरच्या हत्येचा पॅटर्न काय?
वनराज आंदेकर हा प्रभाग क्र. १७ चा नगरसेवक असून त्याचे सांगणेवरुन आरोपींचे दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली असे आरोपींना संशय आल्याने त्या कारणावरुन वर नमूद केले तारीख वेळी व ठिकाणी आरोपी क्र.०१ व आरोपी क्र.०२ यांनी त्यांचे इतर साथीदार आरोपींचे सह संगनमत करुन कट रचून चिथावणी देऊन फिर्यादी यांचा मुलगा वनराज सुर्यकांत आंदेकर यास पिस्तुलने फायरींग करुन कोयत्या सारखे धारदार शस्त्राने हल्ला करुन जिवे ठार मारले आहे.
तक्रारीवरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदेकर टोळीची होती पुण्यात दहशत
वनराज 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आला होता. वनराजची आई राजश्री आंदेकर आणि काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक राहिले आहेत. वनराजची एक बहीण वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या. वनराजच्या हत्येवेळी देखील बहिण संजीवनी ही गॅलरीत उभी होती, तिने यावेळी मारा मारा सोडू नका म्हणत चिथावणी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, आंदेकर टोळीची देखील शहराच्या मध्य भागात दहशत असल्याची माहिती आहे. वनराजचा बाप सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हा या टोळीचा म्होरक्या असल्याती माहिती आहे. हत्या, खुनाचा प्रयत्न, मारामारी, दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे आंदेकर टोळीवर आहेत.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाड हा आंदेकरच्या टोळीत होता. मात्र, आंदेकर टोळीनं गायकवाडच्या साथीदाराचा नाना पेठेतच खून केला होता. त्यामुळं सोमनाथ गायकवाडनं आंदेकरच्या टोळीतून फुटून आपली स्वत:ची टोळी तयार केली होती. त्यामुळं बदल्याची एक किनार देखील या हत्येला असल्याचं बोललं जातं आहे.
वनराजच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलंय की सुरु झालं आहे असा प्रश्न निर्माण झालं आहे. पण एकूणच पोलिसांच्या आणि गृहविभागाच्या समोर हे टोळीयुद्ध रोखणं मोठं आव्हान असणार आहे.
ADVERTISEMENT