Kolhapur Crime News : कोल्हापुरातील सानेगुरूजी वसाहत परिसरात अल्पवयीन मुलीची छेडछाड करणार्या दोघा तरुणांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी स्थानिकांनी छेडछाड करणाऱ्या तरुणाला चोप दिला आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याआधी त्या दोघा तरुणांना समज देऊनही त्यांनी छेडछाड चालूच ठेवली होती. त्यानंतरही हा प्रकार चालूच ठेवल्याने नागरिकांनी त्यांना चोप देऊन पोलिसात गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
आधी समज, नंतर गुन्हा
कोल्हापुरातील सानेगुरूजी वसाहत परिसरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची दररोज छेड काढली जात होती. दोघे तरूण त्या मुलीचा पाठलाग करून, तिला अश्लिल खाणाखुणा करत होते. दरम्यान संबंधित मुलीच्या आईनं तक्रार दिल्यानंतर, निहाल नालबंद आणि आयान शेख या दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडं मुलीची छेड काढणार्या एका तरूणाला, संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला आहे.
शाळेपासून घरापर्यंत छेडछाड
कोल्हापुरातील ज्या मुलीची छेड काढण्यात आली, ती मुलगी मुलगी रोज सकाळी 10 वाजता मैत्रीणींसोबत शाळेला जाते. तर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती घरी परत येते. गेल्या 8 दिवसांपासून दोन तरूण त्या मुलीचा पाठलाग करत होते. पाठलाग करत असताना मुलीकडे बघून अश्लिल हावभाव करणे, खाणाखुणा करणे असे प्रकार त्या मुलांकडून केले जात होते. तसेच शाळा सुटल्यानंतरदेखील ते दोघेजण दुचाकीवरून मुलीचा पाठलाग करत होते. तर 2 दिवसांपूर्वी सूरज मनेराजुरी या स्थानिक तरूणानं, शालेय मुलीचा पाठलाग करणार्या त्या दोघा तरूणांना समज दिली होती. त्यानंतरही त्या तरुणांनी मुलीचा पाठलाग सुरूच ठेवला होता.
पळून गेलेला सापडताच बदडले
त्यानंतर बुधवारी सानेगुरूजी वसाहतीमधील तरूणांनी त्या दोघा रोडरोमियोना अडवून जाब विचारला. त्यावेळी दोघांनीही पळ काढला. दरम्यान त्या मुलीच्या कुटुंबीयांनी बुधवारी त्या दोन तरुणांविरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली. त्याच वेळी त्या दोघा तरूणांपैकी, एकजण पुन्हा सानेगुरूजी वसाहत परिसरात फिरताना दिसून आला. त्यावेळी संतप्त नागरिकांनी त्या तरूणाला बेदम चोप दिला आणि राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केलं.
पालकवर्गही संतप्त
शाळेत जाणाऱ्या मुलीची छेड काढण्यात आल्याने झालेल्या प्रकाराबद्दल पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडू नये म्हणून छेडछाड काढणाऱ्यांना पोलिसांनी योग्य ती समज द्यावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
ADVERTISEMENT