–शिवकुमार तिवारी, मुंबई
ADVERTISEMENT
Jaipur Mumbai Train Shooting in Marathi : जयपूर-मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना 31 जुलै रोजी घडली होती. रेल्वे संरक्षक दलाचा जवान चेतन कुमार सिंह याने धावत्या गाडीतच तीन मुस्लीम व्यक्तींसह आरपीएफचे वरिष्ठ सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणात आता चेतन कुमार सिंहच्या पत्नीने चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. “हिंदुत्व धोक्यात आल्याची भीती वाटत होती. मानसिक आजारी असल्याने ही घटना घडली, असे त्यांनी म्हटले आहे.
चेतन कुमार सिंहची पत्नी प्रियांकाने सांगितले की, “गोळीबाराची घटना घडली, त्याच्या आधीपासूनच त्याची (आरपीएफ जवान चेतन कुमार सिंह) मानसिक स्थिती चांगली नव्हती. हिंदुत्व संपण्याची भीती वाटत होती. याचाच विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. त्याने तीन दाढी असलेल्या व्यक्तींची आणि आरपीएफ जवान मीणा यांची गोळ्या घालून हत्या केली तेव्हा तो मानसिक आजारी होता.”
आरपीएफ जवानाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
प्रियांका म्हणाली की, “चेतनच्या डोक्यात काल्पनिक गोष्टी सुरू होत्या. हिंदुत्व धोक्यात असल्याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू होते.” प्रियांकाने असेही सांगितलं की, “त्याला त्याचा अर्धा पगार राम मंदिराच्या उभारणीसाठी द्यायचा होता. त्यामुळे त्याचे बँक खाते गोठवण्यात यावे.”
हेही वाचा >> ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, सुनावणीत काय घडलं?
रेल्वे अधिकाऱ्यांना दिली होती माहिती
प्रियांकाने या घटनेबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. आम्ही दोन वर्षांपूर्वीच अधिकाऱ्यांना सांगितले होते की, त्यांची मानसिक स्थिती चांगली नाहीये. त्यांच्या मेंदूत गाठ तयार झाली आहे. मानसिक स्थिती चांगली नसल्याने त्याला शस्त्र द्यायला नको होते”, असा दावा प्रियांकाने केला.
चेतन कुमार सिंहच्या वकिलाने कोर्टाला काय सांगितले?
आरपीएफ जवान चेतन कुमार सिंहचे वकील अनिल मिश्रा यांनी कोर्टाला लिखित स्वरुपात सांगितले की, “घटना घडली त्यावेळी चेतन सिंहची मनोवस्था चांगली नव्हती. तो डिप्रेशनमध्ये होता. त्याने जे काही केले, ते मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे केले. त्याच्याविरुद्ध अशी कलमे लावण्यात आली आहेत, जी लावायला नको होती.”
हेही वाचा >> “…तीच भूमिका प्रफुल पटेलांबद्दलही असती”, ठाकरेंवर पलटवार, भाजपने सोडलं मौन
आता चेतन कुमार सिंह याला 16 डिसेंबर रोजी कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. मात्र, त्याच्या पत्नीने केलेल्या दाव्यांमुळे संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण लागलं आहे.
ADVERTISEMENT