Baramati Lok Sabha election 2024, Supriya Sule, Ajit Pawar : (वसंत मोरे, बारामती) बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचा अजित पवारांनी चंग बांधला आहे. त्यासाठी राजकीय विरोधकांसोबत जुळवून घेतले आहे. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात उडी घेतली आहे. सुनेत्रा पवारांना निवडून आणू, असे माने यांनी आपली भूमिका जाहीर करताना सांगितले. (pravin mane and dashrath mane extended support to sunetra pawar in lok sabha election)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होत असलेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आहे. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी दिली आहे. अजित पवारांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले असून राजकीय विरोधकांशीही हात मिळवणी केली आहे.
प्रवीण मानेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
सोनई डेअरी संस्थेचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे सुपुत्र प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच सुप्रिया सुळेंची साथ सोडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दशरथ माने यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला.
प्रवीण माने हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी भूमिका बदलल्याने हा सुप्रिया सुळेंना धक्का मानला जात आहे.
सुनेत्रा पवारांना निवडून आणणार -माने
प्रवीण माने म्हणाले की, "माने कुटुंब पवार कुटुंबासोबत राहिलेले आहे. राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले आहेत. अजित पवार यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी माने परिवाराने निर्णय घेतलेला आहे."
"उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. महायुतीतील सगळ्या नेत्यांबरोबर आम्ही प्रचार करणार आहोत. आठ-दहा दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाली", असे ते म्हणाले.
हेही वाचा >> बच्चू कडूंचा 'महायुती'ला आणखी एक झटका!
दशरथ माने म्हणाले की, "सुनेत्रा पवारांच्या पाठिंशी उभं राहण्याचा निर्णय प्रविण माने यांनी घेतलेला आहे. महायुतीमध्ये जागावाटपात वेळ जात होत होता म्हणून नाव जाहीर करणे शक्य झाले नाही. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांचे नाव बारामतीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे लोकांमधील संभ्रम दूर होत आहे."
हेही वाचा >> ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलप, संजय पवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
"सहानुभूतीपेक्षा विकासालाच महत्त्व द्यायची ही भूमिका प्रविण माने आणि सोनाई परिवाराची आहे. या भागाचा विकास कोण करून शकतो, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही काँग्रेसचे नेते राहुल गांधींना पंतप्रधान करणारी असणार आहे. तर साहेब माझे कितीही घरातील असू द्या. जवळचे असू द्या, तर मी साहेबांना विरोधच करणार. राष्ट्रहिताला प्राधान्य देणार", असे दशरथ माने म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांची घरी जाऊन भेट घेतली होती. तेव्हापासूनच प्रविण माने, दशरथ माने हे अजित पवारांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले.
अजित पवार काय म्हणाले?
प्रविण माने यांनी भूमिका जाहीर करण्यापूर्वी बोलताना अजित पवार म्हणालेले की, "तो माझाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाही. आम्ही सगळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबद्दल निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्णय दिलेला आहे. न्यायालयामध्ये याबद्दलची केस सुरू आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून मिसळून काम करत आलो आहे."
ADVERTISEMENT