मोदींचं नाणं महाराष्ट्रात वाजलंच नाही, 19 सभा घेतल्या पण किती उमेदवार जिंकले?

मुंबई तक

06 Jun 2024 (अपडेटेड: 06 Jun 2024, 04:53 PM)

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींनी तब्बल 19 सभा घेतल्या. पण यापैकी त्या ठिकाणचे किती उमेदवार निवडून आले याबाबत सविस्तर जाणून घ्या.

मोदींचं नाणं महाराष्ट्रात वाजलंच नाही, 19 सभा घेतल्या पण किती उमेदवार जिंकले?

मोदींचं नाणं महाराष्ट्रात वाजलंच नाही, 19 सभा घेतल्या पण किती उमेदवार जिंकले?

follow google news

PM Modi Maharashtra public meetings and Election Result: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 ही भाजपसाठी अजिबातच सोप्पी नव्हती हे काल (4 जून) जाहीर झालेल्या निकालातून पाहायला मिळालं. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजपने मोठं यश मिळावलं होतं. पण 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी महाराष्ट्रात मोठं आव्हान होतं. त्यामुळे स्वत: पंतप्रधान मोदींनी तब्बल 19 सभा आणि एक रोड शो हा महाराष्ट्रात केला होता. पण मोदींनी एवढ्या सभा घेऊन देखील महाराष्ट्रात त्यांना केवळ 9 जागांवरच विजय मिळवता आला तर NDA ला फक्त 17 जागाच मिळाल्या. (lok sabha election 2024 prime minister modi held as many as 19 meetings in maharashtra but in only four of these seats mahayuti candidates were elected)

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदींनी 19 मतदारसंघामध्ये त्यापैकी 15 मतदारसंघांमध्ये भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी मुंबईत जो रोड शो केला होता त्या मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा देखील पराभव झाला. तर त्यानंतर मुंबईतील सहा मतदारासंघांसाठी देखील मिळून पंतप्रधान मोदींनी एक जाहीर सभा ही शिवाजी पार्कवर घेतली होती. पण मुंबईतही त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. इथे भाजपचा 1 आणि शिवसेना (शिंदे गट) 1 अशा दोनच जागा निवडून आल्या. 

पंतप्रधान मोदींनी जिथे-जिथे जाहीर सभा घेतल्या त्या मतदारसंघांमध्ये नेमकाी काय निकाल आला हे आता आपण सविस्तरपणे पाहूयात.. 

1. चंद्रपूर - चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली होती. पण तरीही मुनगंटीवार यांचा तब्बल 260406 लाख मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या निवडून आल्या. ज्यांना 718410 मतं मिळाली तर सुधीर मुनगंटीवार यांना केवळ 458004 मतं मिळाली.

2. रामटेक - पंतप्रधान मोदींनी रामटेक जाहीर सभा घेतली होती. ही सभा त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी घेतली होती. पण इथे राजू पारवेंचा तब्बल 76768 हजार मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे निवडून आले. ज्यांना 613025 मतं मिळाली तर राजू पारवे यांना 536257 मतं मिळाली.  

3. वर्धा - वर्ध्यात देखील पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतलेली. ही सभा भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी घेण्यात आली होती. पण इथे रामदास तडस यांचा तब्बल 81648 हजार मतांनी पराभव झाला. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अमर काळे हे निवडून आले. ज्यांना 533106 मतं मिळाली तर रामदास तडस यांना 451458 मतं मिळाली.  

4. नांदेड - पंतप्रधान मोदींनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. ही सभा त्यांनी विद्यमान खासदार आणि भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी घेतलेली. पण इथे त्यांचा 59442 हजार मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडून आले. ज्यांना 528894 मतं मिळाली तर प्रतापराव चिखलीकर यांना 469452 मतं मिळाली. 

5. परभणी - परभणीची जागा ही एनडीएने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दिली होती. खरं तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या कोट्यातून त्यांना देण्यात आली होती. इथे देखील पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली होती. पण येथेही मोदींची किमया फार चालली नाही. कारण इथे शिवसेना (UBT) उमेदवार संजय (बंडू)  जाधव हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनी महादेव जानकर यांचा तब्बल 134061 लाख मतांनी पराभव झाला.

6. कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये 27 एप्रिलला पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली होती. ही सभा त्यांनी विद्यमान खासदार आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी घेतली होती. पण इथे त्यांचा तब्बव 154964 लाख मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे निवडून आले. ज्यांना 754522 मतं मिळाली तर संजय मंडलिक यांना 599558 मतं मिळाली.  

7. सोलापूर - सोलापुरात देखील पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतलेली. ही सभा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी घेण्यात आलेली. पण इथे राम सातपुते यांचा 74197 हजार मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या निवडून आल्या. ज्यांना 620225 मतं मिळाली तर राम सातपुते यांना 546028 मतं मिळाली.  

8. कराड - पंतप्रधान मोदींनी कराडची जाहीर सभा ही सातारा लोकसभा मतदारसंघासाठी घेतली होती. ही सभा त्यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी घेतलेली. जिथे भाजपला फायदा झाला. कारण येथून उदयनराजे हे 32771 मतांनी जिंकून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा पराभव केला.

9. पुणे - पुण्यात देखील पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतलेली. ही सभा भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी घेण्यात आलेली. ज्याचा मोहोळांना फायदा झाला. कारण येथे त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा 123038 लाख मतांनी पराभव केला. पुणे मतदारसंघात मोहोळांना 584728  मतं मिळाली तर रवींद्र धंगेकर यांना 461690 मतं मिळाली.  

10. माळशिरस - माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान मोदींनी माळशिरसमध्ये जाहीर सभा घेतली होती. जिथे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचा 120837 लाख मतांनी पराभव झाला. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हे या निवडून आले. ज्यांना 622213 मतं मिळाली तर रणजीतसिंह यांना 501376 मतं मिळाली.  

11. धाराशीव - पंतप्रधान मोदींनी धाराशीव (उस्मानाबाद) मध्ये जाहीर सभा घेतली होती. ही सभा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी घेतलेली. पण इथे त्यांचा तब्बल 329846 लाख मतांनी पराभव झाला. येथून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे निवडून आले. ज्यांना 748752 मतं मिळाली तर अर्चना पाटील यांना 418906 मतं मिळाली.  

12. लातूर - लातूरमध्ये पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतलेली. ही सभा भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्यासाठी घेण्यात आलेली. पण मोदींच्या सभेचा देखील श्रृंगारेंना फायदा झाला नाही. कारण येथे त्यांचा काँग्रेसच्या शिवाजी काळगेंनी 61881 हजार मतांनी पराभव केला. लातूर मतदारसंघात काळगेंना 609021 मतं मिळाली तर सुधाकर श्रृंगारे यांना 547140 मतं मिळाली. 

13. अहमदनगर - पंतप्रधान मोदींनी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेतली होती. ही सभा त्यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी घेतली होती. पण इथे सुजय विखेंचा 28929 हजार मतांनी पराभव झाला. येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे निलेश लंके हे निवडून आले. ज्यांना 624797 मतं मिळाली तर सुजय विखे यांना 595868 मतं मिळाली.  

14. अंबाजोगाई -  पंतप्रधान मोदींनी भाजपच्या बीड मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडेंसाठी जाहीर सभा घेतलेली. पण इथे अनपेक्षितपणे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. जो अवघ्या 6553 हजार झाला. येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बजरंग सोनावणे हे निवडून आले. ज्यांना 683950 मतं मिळाली तर पंकजा मुंडे यांना 677397 मतं मिळाली.  

15. नंदूरबार - नंदूरबारमध्ये भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली होती. पण तरीही हिना गावित यांचा तब्बल 159120 लाख मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसचे गोवाल पाडवी हे निवडून आले. ज्यांना 745998 मतं मिळाली तर हिना गावित यांना केवळ 586878 मतं मिळाली.

16. कल्याण - कल्याणमध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतलेली. ज्याचा त्यांना फायदा झाला. कारण येथून श्रीकांत शिंदे हे 209144 लाख मतांनी निवडून आले. त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव केला. श्रीकांत शिंदे यांना 589636 मतं मिळाली तर वैशाली दरेकर यांना केवळ 380492 मतं मिळाली.

17. नाशिक - नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतलेली. पण तरीही गोडसेंचा तब्बल 162001 लाख मतांनी पराभव झाला. येथून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे राजाभाऊ वाजे हे निवडून आले. ज्यांना 616729 मतं मिळाली तर हेमंत गोडसे यांना केवळ 454728 मतं मिळाली.

18. दिंडोरी - दिंडोरीमध्ये भाजप उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर सभा घेतली होती. पण तरीही भारती पवार यांचा तब्बल 113199 लाख मतांनी पराभव झाला. येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे भास्कर भगरे हे निवडून आले. ज्यांना 577339 मतं मिळाली तर भारती पवार यांना केवळ 464140 मतं मिळाली.

19. मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी एकच जाहीर सभा ही मुंबईतील शिवाजी पार्कवर घेतली होती. पण मुंबईत भाजप किंवा एनडीएचा फारसा दबदबा पाहायला मिळाला नाही. कारण सहा मतदारसंघांपैकी केवळ दोनच मतदारसंघांत एनडीएला यश मिळालं. ज्यापैकी मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर हे निवडून आले. 

घाटकोपर (रोड शो) - मुंबईतील घाटकोपरमध्ये एक रोड शो देखील केला होता. ज्या भागातून पंतप्रधान मोदींनी रोड शो केला होता तो मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाग आहे. पण येथे देखील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी 29861 मतांनी विजय मिळवला.

    follow whatsapp