शिंदेंच्या शिवसेनेने BJP कडून मिळवल्या 15 जागा, पण गमावल्या 'या' हक्काच्या 8 जागा

मुंबई तक

03 May 2024 (अपडेटेड: 03 May 2024, 05:59 PM)

Lok Sabha Election 2024: जागावाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा गमवाव्या लागल्या आहेत. 8 जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार दिले आहेत.

शिंदेंना सोडाव्या लागल्या 'या' 8 जागा, मतदार काय देणार कौल?

शिंदेंना सोडाव्या लागल्या 'या' 8 जागा, मतदार काय देणार कौल?

follow google news

Shinde Shiv Sena: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणते पक्ष किती जागा लढवणार हे आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी आज (3 मे) अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अगदी कालपर्यंत उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, सत्तेत असलेल्या महायुतीत नेमक्या कोणाला किती जागा मिळतात याकडे सगळ्याचं लक्ष होतं. ज्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला जवळजवळ 8 जागा कमी मिळाल्याचं दिसतं आहे. (lok sabha election 2024 shinde shiv sena get 15 seat in seat sharing from the bjp but had to give up 8 seats to its allies)

हे वाचलं का?

2019 लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपची युती होती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपने 25 आणि शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढवली होती. पण आता भाजपसोबत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत 8 जागा कमी मिळाल्या आहेत.

हे ही वाचा>> माझ्यावर बाळासाहेबांचं कर्ज, ते मी कधीही..: PM मोदी

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत 13 खासदार आले होते. त्यामुळे त्या सर्व जागा मिळाव्यात असा शिंदे गटाचा आग्रह होता. त्यामुळे भाजपने 15 जागा या शिवसेनेला देऊ केल्या. पण त्यापैकी काही विद्यमान खासदारांची तिकीटं मात्र, कापण्यात आली. मात्र, 2019 चा विचार केल्यास यावेळेस शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा कमी मिळाल्या आहेत. 

2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढवलेले कोणते मतदारसंघ गेले मित्रपक्षांकडे?

2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उस्मानाबाद, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, शिरूर, पालघर, रायगड, परभणी, सातारा या लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिले होते. मात्र, हे आठही मतदारसंघ आता भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. 

या 8 मतदारसंघांपैकी उस्मानाबाद, रायगड, शिरूर हे 3 मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना परभणीची जागा देण्यात आली आहे.

हे ही वाचा>> भाजप-एनडीए किती जागा जिंकेल? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला

तर अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, सातारा हे 4 मतदारसंघ भाजपकडे गेले आहेत. जिथे 2019 साली शिवसेनेने आपले उमेदवार दिले होते. 

या 8 जागांपैकी अनेक मतदारसंघात शिवसेनेची बरीच ताकद होती. पण आता तिथे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हच नसणार आहे. अशावेळी शिवसेनेचा जो पारंपारिक मतदार आहे तो नेमकं कोणाच्या पारड्यात दान टाकणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना लोकसभा उमेदवारांची यादी

1) कोल्हापूर -संजय मंडलिक
2) रामटेक - राजू पारवे
3) बुलढाणा- प्रतापराव जाधव
4) यवतमाळ-वाशिम - राजश्री पाटील
5) मावळ -श्रीरंग बारणे
6) हिंगोली - बाबूराव कदम
7) औरंगाबाद - संदीपान भुमरे
8) शिर्डी - सदाशिव लोखंडे
9) नाशिक - हेमंत गोडसे
10) ठाणे - नरेश म्हस्के
11) दक्षिण मुंबई - यामिनी जाधव
12) उत्तर पश्चिम मुंबई - रवींद्र वायकर
13) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
14) हातकणंगले - धैर्यशील माने
15) कल्याण - श्रीकांत शिंदे

2019 मध्ये लढल्या होत्या 23 जागा

शिवसेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये होती. भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. मात्र,  शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीत आहे, तर शिंदेंची शिवसेना ही महायुतीमध्ये आहे. यावेळी जागावाटपात महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 21 जागा मिळाल्या असून, शिंदेंच्या सेनेला 15  जागा मिळाल्या आहेत.
 

    follow whatsapp