CM Eknath Shinde On Aaditya Thackeray Allegation : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू असून राजकारणही तापले आहे. उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं जात आहे. अशात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. 'लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्रे आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व बाहेर काढेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही', असा इशारा शिंदेंनी ठाकरेंना दिला. (London to Lucknow There are all the documents of Thackeray's case Follow the limits or I will expose everything CM Eknath Shinde Speaks on Aaditya Thackeray allegations)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मंगळवारी (23 एप्रिल) मावळ येथे झालेल्या सभेत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. 'एकनाथ शिंदे यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं. गोडाऊनवर इन्कम टॅक्सची धाड पडली होती', असे आदित्य ठाकरे म्हणाले. याला सणसणीत उत्तर देताना शिंदेंनी खिल्ली उडवली.
हेही वाचा: "...आणि शिव्या आम्हाला घालता?", पवारांनी सभेत लावलं मोदींचं 'ते' भाषण
"पोराटोरांवर मी बोलत नाही"
"सत्ता गेल्यानंतर लोक वेडेपिसे झालेत, त्यामुळे त्यांचं संतुलन पण बिघडलेलं आहे. पोराटोरांवर तर मी बोलत नाही. त्यांचं वय किती, त्यांना कामाचा अनुभव किती, त्यांचं पक्षासाठी योगदान किती? आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पक्षाचं काम केलेले, रक्ताचं पाणी केलेले लोक, पाया पडून घेणं हे काय आहे? लोकांना ते आवडत नाही. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु हे सरमजारदार, संरमजारशाहीने वागणारे लोक आपल्या लोकांना घरगडी, नोकर समजतात आणि यामुळेच तर हा सर्व इतिहास घडला आहे", असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
"सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण बाळासाहेबांची..."
"लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्रे आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही", असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दिला.
तसंच, आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यानंतर आमच्याकडे खूप काही आहे. लंडनच्या विश्रांतीचा उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? आमच्याकडे सगळं आहे. लखनौमध्ये 200 एकर जमीन चतुर्वेदींची पकडली त्याबरोबर कोण आहे सगळं माहीत आहे. लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत सगळं माहिती आहे सगळे कागदपत्र आहेत. पण आम्ही मर्यादा पाळतो. वैयक्तिक आरोप करणं बाळासाहेबांनी आणि आनंद दिघेंनी शिकवलं नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले आहेत", असं शिंदे म्हणाले.
"शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं", ठाकरेंचा आरोप, मुख्यमंत्री काय म्हणाले?
"जनतेला माहित आहे एकनाथ शिंदे काय आहे आणि त्यांच्याकडे पैसे किती आहेत. जनता आणि त्यांचं प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे. कोणी तरी म्हटलं होतं यांना खोके नाही कंटेनर लागतात, आता हे कंटेनर व्हाया कुठे गेले हे ही सगळं माहितीये. दोन वर्षानंतर यांना हे आठवलं. जे खोक्यांचा आरोप आमच्यावर करतात आता त्यांनाच खोक्याशिवाय रात्रीची झोप येत नाही. उठता-बसता खोके मोजल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अरे त्यांनी कुठला आरोप करायचा आमच्यावर.. आम्हाला ना मोह, ना माया, कुठली प्रॉपर्टी नाही. बंगले मिळवायचे नाहीत, आम्हाला काही नाही फक्त लोकांची सेवा करायची आहे. हेच बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे मला जास्त काही बोलण्यास भाग पाडू नये", असे शिंदे म्हणाले.
"मोदी द्वेषाने पछाडलेले लोक, जनता यांचा बंदोबस्त करेल"
कंटेनर, लंडन, लखनऊ ची जमीन या तीन गोष्टी तुमच्याकडे आहेत याची गुपितं कधी बाहेर काढणार? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, "प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. आता त्यांच्या बॅलन्स गेला. उठता बसता मोदी, शाह, एकनाथ शिंदेंना बोलतात. तुमची पात्रता काय तुम्ही बोलता किती? मोदींवर का जेलसी? हे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक असून जनता यांचा बंदोबस्त करेल. 2024 ला यांचा दारुण पराभव होणार आहे", असंही शिंदे यावेळी म्हणाले.
हेही वाचा: काँग्रेसची पित्रोदांमुळे पंचाईत! शाह संतापले; म्हणाले, "काँग्रेसचे पितळ उघडे पडलेय"
तसंच संजय राऊतांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "संजय राऊतांबद्दल बोलायचं नाही त्यांनी संयम राखावा. महायुतीत काही अडचण नाही आमचं टार्गेट एकच मोदी सरकार आहे."
ADVERTISEMENT