Ramdas Athawale: एकही खासदार नसताना मोदी मंत्रिमंडळात आठवलेंची सीट का असते फिक्स?

राहुल गायकवाड

• 01:28 PM • 10 Jun 2024

Modi Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळविण्याची करामत रामदास आठवले यांनी केली आहे. जाणून घ्या आठवलेंनी ही किमया नेमकी कशी साधली आहे.

एकही खासदार नसताना मोदी मंत्रिमंडळात आठवलेंना मंत्रिपद कसं मिळतं?

एकही खासदार नसताना मोदी मंत्रिमंडळात आठवलेंना मंत्रिपद कसं मिळतं?

follow google news

Ramdas Athawale: नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी काल (9 जून) पार पडला. पंडित नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं, ते म्हणजे रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट पक्की असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया. (why does ramdas athawale have a ministerial position in the nodi cabinet when there is no mp)

हे वाचलं का?

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी मोदींच्या तिसऱ्या सरकारचा शपथविधी पार पडला. या सोहळ्याला जगभरातून पाहुणे आले होते. मोदींच्या मंत्रिमंडळात 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश होता. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांचा समावेश करण्यात आला आहे. 

रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आता रामदास आठवलेंना पुन्हा सामाजिक न्याय खातं मिळतं की आणखी कुठलं खातं दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे ही वाचा>> PM Modi new cabinet minister list 2024 : असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी

2014 पासून रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. विशेष म्हणजे 2014 पासून आठवलेंचा एकही खासदार लोकसभेत निवडूण गेलेला नाही, त्याचबरोबर महाराष्ट्रातील विधानसभेत देखील त्यांचा एकही आमदार नाहीये. आठवले हे स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत. एप्रिल 2026 ला आठवलेंचा खासदार पदाचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे 2026 पर्यंत तरी आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणार आहेत.

एकीकडे एकनाथ शिंदे यांचे सात खासदार असताना त्यांना केवळ एक राज्यमंत्री पद दिलं गेलं दुसरीकडे आठवलेंना मात्र एकही खासदार नसताना मंत्री करण्यात आलं. त्यामुळे अनेकदा प्रश्न विचारला जातो की मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलेंचं स्थान पक्कं कसं असतं. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मोदींचं सोशल इंजिनिअरिंग समजावून घ्यावं लागेल. रामदास आठवले या आधी मुंबई आणि पंढरपूरमधून लोकसभेत निवडून गेले आहेत. आठवलेंचा जन्म सांगलीचा, ते शिक्षणासाठी मुंबईत आले पुढे दलित चळवळीत सक्रीय झाले.

दलित पँथर संघटनेत रामदास आठवले महत्त्वाचे नेते होते. 70 च्या दशकामध्ये दलित पँथरची भल्याभल्यांना धडकी भरली होती. जिथे कुठे दलितांवर अन्याय होत असे दलित पँथर तिथे अन्यायाला वाचा फोडत होती. दलित पँथरचा मोठा झंझावात होता. अशा दलित पँथरमधून आठवलेंचा चेहरा पुढे आला.

हे ही वाचा>> Modi New Cabinet : भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'कॅबिनेट मंत्रिपद' का दिलं नाही?

आठवले पुढे खासदार झाले. कधी काँग्रेसच्या तर कधी भाजपच्या जवळचं राजकारण त्यांनी केलं आहे. अनेकदा गमतीनं म्हटलं जात, सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट पक्की असते. त्यामुळेच आठवलेंना सोबत घेणं मोदींना का गरजेचं वाटतं, हेच आपण समजावून घेऊया. 

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित म्हणतात, ‘आठवले मोदींसाठी दलितांचा एक सिम्बॉलिक चेहरा आहेत. महाराष्ट्रात भाजपला मोठा दलित चेहरा मिळू शकला नाही. आठवलेंना अजूनही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास फॉलोविंग आहे. त्यामुळे भाजप त्यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या मतांचा किती फायदा होतो हा जरी भाग असला तरी एक सिम्बॉल म्हणून आठवलेंना सोबत ठेवणं भाजपला गरजेचं वाटतं. असं असलं तरी भाजपला आठवलेंचा हवा तितका फायदा करुन घेता आला नाही. ते केवळ सिम्बॉल पुरते मर्यादित राहिले.' 

'विरोधक एकीकडे संविधान बदलाचं नॅरेटिव्ह सेट करत असताना आठवलेंचा उपयोग त्या विरोधात करता आला असता, परंतु तो केल्याचं दिसलं नाही.’ 

यंदाच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये मोदींच्या सभांमध्ये आठवले भाषण करताना दिसून आले. खरंतर शिर्डीची जागा ही आठवलेंना हवी होती, परंतु ती त्यांना मिळाली नाही, दुसरीकडे राज्यमंत्री पद नाही तर कॅबिनेट मंत्रिपद आठवलेंना हवं होतं, परंतु ते देखील त्यांना मिळू शकलं नाही. असं असलं तरी आठवलेंनी मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवलेंची तिसरी कारकिर्द कशी असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp