Lok Sabha 2024 : 'या' तीन तालुक्यातील राजकारण अजित पवारांचं गणित बिघडवणार?

राहुल गायकवाड

• 06:29 PM • 12 Mar 2024

शिवतारे राज्यमंत्री असताना पुरंदरवरुन बारामतीला देण्यात येणाऱ्या पाण्यावरुन वाद पेटला होता. अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यातील संघर्ष अद्याप सुरु आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्या नेत्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवारांचे चिंता वाढवणार, असे दिसत आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे

point

अजित पवारांना कोणत्या नेत्याचे आव्हान?

Baramati Lok Sabha 2024 Ajit Pawar : राज्यात सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या मतदारसंघावर असेल तर ते म्हणजे बारामती. पहिल्यांदाच सुळे विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये होणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्याचं स्पष्ट झाल्याने कोण निवडूण येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, दुसरीकडे मुलीसाठी शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये पवारांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. अजित पवार देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी मतदारसंघात मोर्चेबांधणी करत आहेत. अजित पवार जरी जोरदार तयारी करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असे तीन तालुके आहेत जे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतात. नेमके हे तालुके कुठले आणि या तीन तालुक्यांचं राजकारण अजित पवारांचं लोकसभेचं गणित कसं बिघडवू शकतं हेच समजून घ्या...

हे वाचलं का?

अजित पवार आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी जीवाचं रान करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, भोर आणि पुरंदर या तीन तालुक्यांचं गणित अजित पवारांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. हे समजून घेण्यासाठी सुरुवात करुयात इंदापूर तालुक्यापासून.... 

इंदापूर कसा महत्त्वाचा...

इंदापूर हा पूर्वीचे काँग्रेसचे आणि सध्याचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा गड मानला जायचा. या गडाला सुरुंग अजित पवारांनी लावण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तरी चालेल पण राष्ट्रवादी आपला उमेदवार उतरवणार असं म्हणत अजित पवारांनी दत्ता भरणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

१९९५ ते २०१४ हर्षवर्धन पाटील यांची या भागात निर्विवाद सत्ता होती. २०१४ ला अजित पवारांनी दत्ता भरणे यांना निवडूण आणलं. पुढे २०१९ ला देखील अजित पवारांनी दत्ता भरणे यांना उमेदवारी देऊन निवडूण आणलं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. हे वितुष्ट अजूनही सुरु आहे. 

अलिकडेच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मित्र पक्षातील काही लोक धमक्या देत असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे अंकिता पाटील यांनी देखील अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. 

भोरमध्ये काय समीकरण?

आता आपण भोरचं गणित पाहुयात. भोरमध्ये संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. संग्राम थोपटेंचे वडील अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचा ४० वर्ष संघर्ष होता. नुकताच भोरमध्ये शरद पवारांनी अनंतरावांची भेट घेत हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यातील संघर्ष अद्याप सुरु आहे. २०१९ च्या मंत्रिमंडळात संग्राम थोपटे यांना मंत्री केलं जाणार होतं परंतु लिस्टमध्ये नाव असताना ऐनवेळी ते काढल्याचा आरोप थोपटे यांनी केला. दुसरीकडे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष संग्राम थोपटे यांना करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विधानसभा अध्यक्षांची निवड लांबवण्यात आली. त्यावेळी देखील अजित पवारांनी अध्यक्ष होऊ दिला नसल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला होता. त्यामुळे संग्राम थोपटे आणि अजित पवार यांच्यातील वाद अद्याप सुरुच आहे. 

शिवतारेंची बदला घेण्याची भाषा

पुरंदरमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. नुकताच शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. आता दादा आणि विजय शिवतारे यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी पाहणं महत्त्वाचं आहे.

२०१९ च्या निवडणुकीत ‘तू आमदार होतोच कसा हेच पाहतो’ असं म्हणत अजित पवारांनी शिवतारे यांचा पराभव केला होता. या सगळ्याची सुरुवात जुन्या वादातून होते. अजित पवारांचे उमेदवार दिगंबर दुर्गाडे यांचा विजय शिवतारे यांनी पराभव केला होता. 

शिवतारे राज्यमंत्री असताना पुरंदरवरुन बारामतीला देण्यात येणाऱ्या पाण्यावरुन वाद पेटला होता. शिवतारे यांनी बारामतीला पाणी कसं जात हे पाहतो असं म्हंटले होतं. त्यातच २०१९ ला अजित पवारांनी शिवतारेंना सांगून पाडलं होतं. २०१९ ला काँग्रेसचे संजय जगताप हे निवडूण आले होते. त्यामुळे आता पुन्हा शिवतारे अजित पवारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. 

आता हे तिन्ही तालुके बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने अजित पवारांचे टेन्शन वाढणार आहे. सुनेत्रा पवार यांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु या तीन तालुक्यातील महत्त्वाचे नेते अजित पवारांच्या विरोधात असल्याने याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. आता याच तिन्ही तालुक्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे आपला जनसंपर्क मजबूत करत आहेत. यावर अजित पवार काय स्ट्रॅटेजी आखतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp