विधानसभा निवडणुकीसाठी यंदा युती आणि आघाडीमध्ये अनेक पक्षांमध्ये जागा वाटपाचं मोठं आव्हान सर्वांसमोर होतं. जागावाटपासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच पक्षांमध्ये बैठकांचा सपाटा सुरू होता. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर तिढा कायम असला तरी बहुतांश जागांबद्दल एकमत झालं आहे. त्यानंतर आता काँग्रेसने 48 उमेदवारांची पहिली आणि 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत आपलं नाव यावं यासाठी अनेक उमेदवारांकडून अजूनही प्रयत्न सुरू आहेत. तर आता यादीत नाव आल्यानंतरही आपल्याला हवा तो मतदारसंघ मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या सचिन सावंत यांच्या एक्स पोस्टची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
सचिन सावंत काय म्हणाले?
मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.
हे ही वाचा >>Dheeraj Ghate Kasba : हिंदुत्ववादी सरकार हवंय, हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला... उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या धीरज घाटेंची नाराजी
सचिन सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित होती. मात्र, मविआच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांना सुटली. त्यामुळे तिथे वरूण सरदेसाई यांना उमेदवारी मिळाली. तर सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून संधी मिळाली. त्यामुळे आपला मतदारसंघ बदलावा म्हणून, त्यांनी आता थेट एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये थेट काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनाही आवाहन केल्यामुळे ते आता यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT