Maharashtra Assembly Elections Result : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. एकीकडे महायुतीला 233 तर महाविकास आघाडीला 49 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र अजूनही काही धक्के महाविकास आघाडीच्या नेत्यांना बसणार असल्याचं दिसतंय. कारण आता स्वत: शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेत फार काळ काम करता येणार असल्याचं दिसतंय. कारण विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालात उद्धव आणि शरद पवार यांच्या पक्षांना अगदी कमी जागा मिळाल्या आहेत.आमदारांची संख्या घटल्यानं या नेत्यांची राज्यसभेवर पुन्हा निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीला सर्व मिळून फक्त 49 जागा जिंकता आल्या. एखाद्या पक्षाला राज्यसभेवर एक खासदार पाठवायचा असेल, त्यासाठी साधारणपणे 43 आमदारांची आवश्यकता असते. त्यामुळे आता संपूर्ण महाविकास आघाडीमधील पक्ष मिळून त्यांना फक्त एकाच व्यक्तीला राज्यसभेवर पाठवता येणार आहे. त्यामुळे कुणाच्या नावावर एकमत होईल, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कुणाचा किती कालावधी बाकी?
हे ही वाचा >> Raj Thackeray MNS : "भाजप सोबत जाणं ही चूक", मनसेच्या बैठकीत उमेदवारांकडून नाराजी - सूत्र
शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी यांची 3 एप्रिल 2020 रोजी सहा वर्षांच्या कालावधीसाठी राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे. तर, संजय राऊत 1 जुलै 2022 रोजी राज्यसभेवर निवडून आले आणि त्यांचा कार्यकाळ 22 जुलै 2028 रोजी संपणार आहे.
कोणी किती जागा जिंकल्या?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील भाजपने 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळवला. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 57 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा असून, सपाने दोन जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे या विधानसभा निवडणुका होत असतानाच नांदेडमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे.
ADVERTISEMENT