Tutari vs Trumpet: 'तुतारी' वाजलीच नाही! 'पिपाणी'ने केला शरद पवारांच्या 'एवढ्या' उमेदवारांचा घात?

रोहित गोळे

25 Nov 2024 (अपडेटेड: 25 Nov 2024, 04:19 PM)

तुतारी या चिन्हासारखेच पिपाणी हे चिन्हही अनेक मतदारसंघात असल्याने त्याचा फटका शरद पवारांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत बसल्याचे पाहायला मिळतं आहे.

 'पिपाणी'ने केला शरद पवारांच्या उमेदवारांचा घात?

'पिपाणी'ने केला शरद पवारांच्या उमेदवारांचा घात?

follow google news

बातम्या हायलाइट

point

तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे अनेक मतदारांचा उडाला गोंधळ?

point

पिपाणी चिन्ह असलेल्या अनेक मतदारसंघात तुतारीच्या उमेदवारांना बसला फटका

point

पिपाणी चिन्हामुळे तुतारीवरील अनेक उमेदवारांचा पराभव

Sharad Pawar NCP Logo, Symbol: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या अवघ्या 46 जागाच निवडून आल्या आहेत. त्यातही सर्वाधिक नुकसान हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं आहे. कारण त्यांचे केवळ 10 आमदारच निवडून आले. दुसरीकडे साधारण 9 जागांवर पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांमुळे पवारांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं आता बोललं जात आहे. (similar to the tutari symbol the trumpet symbol led to the defeat of sharad pawar ncp candidates in many constituencies)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. तर आता पवारांच्या तब्बल 9 उमेदवारांना पिपाणीचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय.

हे ही वाचा>> Raj Thackeray MNS : "भाजप सोबत जाणं ही चूक", मनसेच्या बैठकीत उमेदवारांकडून नाराजी - सूत्र

राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष किंवा ज्या पक्षांना अद्याप राष्ट्रीय पक्षाची मान्यता नाही त्यांना पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह देण्यात आलं होतं.

दरम्यान, अनेक मतदारसंघात पिपाणीवर उभ्या असलेल्या उमेदवारांना बऱ्यापैकी मतदान झाल्याचं समोर आलं आहे. ज्याचा थेट फटका तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांना बसल्याचं आकडेवारीतून पाहायला मिळतंय. 

कोणत्या मतदारसंघात तुतारीच्या उमेदवार पिपाणीमुळे बसला फटका? 

1. जिंतूर -  परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या विजय भांबळे यांचा 4516 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या मेघना बोर्डिकर या निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या  विनोद भावळे यांना या मतदारसंघात तब्बल 7430 मतं मिळाली आहेत.

हे ही वाचा>> Ashok Chavan : "ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला, ते...", पृथ्वीराज चव्हाण, थोरात, पटोलेचं नाव घेत काय म्हणाले चव्हाण?

2. घनसावंगी - जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातील राजेश टोपेंचा पराभव हा (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षासाठी मोठा धक्का होता. पण इथेही पिपाणीमुळेच त्यांच्या पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे.  तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या राजेश टोपे यांचा अवघ्या 2309 मतांनी पराभव झाला. तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे हिकमत उढाण हे निवडून आले आहेत. तर पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या बाबासाहेब शेळके यांना या मतदारसंघात  4830 मतं मिळाली आहेत.

3. शहापूर - ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या पांडुरंग बरोरा यांचा अवघ्या 1672 मतांनी पराभव झाला आहे. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा हे निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या रुपाली अराज यांना या मतदारसंघात 3892 मतं मिळाली आहेत. 

4. बेलापूर -  ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या संदीप नाईक यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला आहे. तिथे भाजपच्या मंदा म्हात्रे या निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या प्रफुल म्हात्रे यांना या मतदारसंघात 2860 मतं मिळाली आहेत.

5. अणुशक्तीनगर - मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या फाहद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक या निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या जयप्रकाश अग्रवाल यांना या मतदारसंघात तब्बल 4075 मतं मिळाली आहेत.

6. आंबेगाव - पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या देवदत्त निकम यांचा अवघ्या 1523 मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील हे निवडून आले आहेत. येथील रंजक बाब म्हणजे या मतदारसंघात देवदत्त शिवाजीराव निकम नावाच्या एका दुसऱ्या उमेदवाराला 2965 मिळाली ज्याचं निवडणूक चिन्ह हे पिपाणी होतं.

7. पारनेर - अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या राणी लंके यांचा अवघ्या 1526 मतांनी पराभव झाला. हा पराभव त्यांचे पती आणि खासदार निलेश लंकेंसाठी मोठा धक्का आहे. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते हे  निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या सखाराम सारक यांना या मतदारसंघात तब्बल 3582 मतं मिळाली आहेत.

8. केज - बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या पृथ्वीराज साठे यांचा 2678 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या नमिता मुंदडा या निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या भास्कर थोरात यांना या मतदारसंघात तब्बल 3559 मतं मिळाली आहेत.

9. परांडा - धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघात (राष्ट्रवादी काँग्रेस - SP) पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभ्या असलेल्या राहुल मोटे यांचा अवघ्या 1509 मतांनी पराभव झाला. तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत हे निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभ्या असलेल्या जमीलखाँ पठाण यांना या मतदारसंघात तब्बल 4446 मतं मिळाली आहेत.

 

    follow whatsapp