Sneha Dube BJP : वसई: वसई आणि नालासोपारा हे दोन मतदारसंघ ठाकूर कुटुंबीयांचे राजकीय गड होते. मागील अनेक वर्ष हितेंद्र ठाकूर आणि त्याचे पुत्र क्षितीज ठाकूर हेच निवडून येत होते. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाकूरांना असा काही झटका दिला की, त्याचा गड पूर्णपणे खालसा झाला. पण यातही वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. भाई ठाकूरांचा भाऊ आणि विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांना थेट भिडणाऱ्या या मर्दानीने आपल्या सासऱ्यांचा खुनाचा वचपा कसा घेतला हा आता वसई-विरारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
ADVERTISEMENT
स्नेहा दुबे या दिवंगत सुरेश दुबे यांच्या स्नुषा आहेत. जमिनीच्या वादातून सुरेश दुबे यांची 1989 साली नालासोपारा रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून दुबे कुटुंबीय हे ठाकूरांविरोधात न्यायलयीन लढाई लढत होतं.
हे ही वाचा >>Assembly Election Results : पवार Vs पवार आणि ठाकरे Vs शिंदे, किती ठिकाणी लढले, किती आमदार पाडले? वाचा सविस्तर
असं असताना दुसरीकडे त्यांनी आपली राजकीय लढाई देखील सुरू केली. ज्यामध्ये यंदा स्नेहा दुबे यांनी यंदा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी स्नेहा दुबे फक्त लढल्याच नाही तर त्यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा दणदणीत पराभवही केला. हा पराभव म्हणजे ठाकूरांच्या आजवरच्या वर्चस्वाला धक्का समजला जात आहे.
काँग्रेसचे नेते युवराज मोहितेंची स्नेहा दुबेंबाबतची पोस्ट जशीच्या तशी...
स्नेहा दुबे यांनी जो विजय मिळवला त्यानंतर त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचा हाच फोटो आणि सुरेश दुबे यांच्या हत्येची नेमकी कहाणी ही युवराज मोहिती यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. वाचा ती पोस्ट जशीच्या तशी...
९ ऑक्टोबर १९८९ ते २३ नोव्हेंबर २०२४
नालासोपारा स्टेशन हादरलं. मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची वाट पहाणाऱ्या प्रवाशांत एक होते सुरेश दुबे. रिवॉल्वर घेतलेले काही मारेकरी आले आणि सुरेश दुबेंवर प्लॅटफॉर्मवरच गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. या घटनेने महाराष्ट्र हादरला. या हत्येतील गुन्हेगार होते जयेंद्र उर्फ भाई ठाकूर…. ३५ वर्षांपूर्वीची ही घटना !
नव्वदच्या दशकात वसई-विरार या भागात जमिनी हडपणे, बळकावणे, बेकायदा बांधकाम याचं पेव फुटलं. युपी मधून येणाऱ्यांचा मोठा भरणा यात होता. सुरेश दुबे आणि त्यांचे चार भाऊ इथे येवून स्थायिक झाले. भूखंड विकत घेणे, बांधकाम करणे हा सुरेश दुबे आणि बंधूंचा व्यवसाय. यातील एक भाऊ डॉक्टर. एकाच इमारतीत हे सगळे भाऊ एकत्र रहायचे.
सुरेश दुबे यांच्याकडे मोक्याचा एक भूखंड होता. भाई ठाकूरची नजर त्यावर पडली. भाईने सुरेशना विरारला बोलावलं. हा भूखंड मला हवाय, असं दरडावलं. नकार देत सुरेश तिथून कसेबसे निघाले. मग धमक्यांचं सत्र सुरू झालं. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. धोका लक्षात घेवून मग कुटुंबियांनी सुरेश यांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला. अनेक दिवस कुटुंबियांच्या गराड्यातच ते राहिले.
एके दिवशी दुबेंकडे एक नातेवाईक आले होते. अनेक दिवस घरात बसून कंटाळलेले सुरेश त्यांच्यासोबत पार्ल्यात निघाले. नालासोपारा स्टेंशनच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पहात असताना तिथे शस्त्र घेवून मारेकरी आले. धडाधड गोळीबार झाला... प्लॅटफॉर्मवर अफरातफरी माजली. गॅंग ऑफ वासेपूर टाईप घटना!
घटनेची दहशत पोलिसांवरही. रेल्वे पोलीस दुबे कुटुंबियांच्या घरी जावून तक्रार दाखल होईल पण यात भाई ठाकूरचं नाव घेवू नका असं सांगू लागले. मग गुन्हा दाखल व्हावा यासाठी दुबेंची पायपीट सुरू झाली. सेशन कोर्टात दाद मागितली. पण या हत्येचा एकही साक्षीदार पुढे आला नाही. ती रिव्हॉल्वरही बदलण्यात आली. पुरावाही नष्ट करण्यात आला.
या नंतर ठाणे जिल्ह्यात सुधाकर सुराडकर डीआयजी म्हणून रुजू झाले. त्यांना हे प्रकरण कळलं. त्यांच्या मुळे गुन्हा दाखल झाला. भाई ठाकूर सहित अन्य गुन्हेगार ‘टाडा’ अंतर्गत जेलमध्ये गेले. त्यांना सजा झाली. भाई सध्या पॅरोलवर आहे.
हे सगळं प्रकरण वसईतील नागरिक, सजक लोक, श्रमजिवी संघटने मार्फत विवेक पंडीत यांनी लावून धरलं होतं. आंदोलनं सुरू होती. याच काळात भाईचा भाऊ हिंतेंद्र ठाकूर राजकारणात सक्रिय झाला. त्याला कुणीच हरवू शकत नव्हतं. आता स्नेहा पंडीत - दुबे या नवख्या उमेदवाराने हितेंद्र ठाकूर यांचा वसईत पराभव केलाय.
स्नेहा ही विवेक पंडीत यांची मुलगी, आणि सुरेश दुबे यांची सून आहे !
असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यामुळेच सध्या वसई-विरारमध्ये स्नेहा दुबे यांच्या विजयाची आणि सुरेश दुबेंच्या हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
स्नेहा दुबे पंडीत यांचा जन्म 1985 साली वसईत झाला होता. समाजसेवक विवेक पंडित यांच्या त्या कन्या आहेत. विवेक पंडीत यांनीच सुरेश दुबे यांच्या हत्येचं प्रकरण हे लावून धरलं होतं. ज्यामुळे हितेंद्र ठाकूर यांचा भाऊ भाई ठाकूरला तुरुंगात जावं लागलं होतं. स्नेहा दुबे या पेशाने वकील आहेत. त्या न्यायाधीश पॅनेलच्या सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
क्षितीज ठाकूरांचाही पराभव
हे ही वाचा >> Tutari vs Trumpet: 'तुतारी' वाजलीच नाही! 'पिपाणी'ने केला शरद पवारांच्या 'एवढ्या' उमेदवारांचा घात?
एकीकडे वसईमधून हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला तर दुसरीकडे नालसोपारा मतदारसंघात त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूरांचाही मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. भाजपच्या राजन नाईक यांनी हा पराभव केला आहे. एकाच वेळी पिता-पुत्रांचा पराभव हा ठाकूर कुटुंबीयांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT