Vinod Tawde Vs Hitendra Thakur Chaos : राज्यात विधानसभा निवडणुकांचं उद्या मतदान आहे. एकीकडे सर्व उमेदवारांची धाकधूक वाढलेली असताना दुसरीकडे विरारमध्ये तुफान राडा झालाय. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे सध्या राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आहेत. विनोद तावडे हे विरारमध्ये असताना ते थांबलेल्या हॉटेलमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले आणि एकच राडा झाला. विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तिथे तुफान राडा केला आणि तावडेंना घेरुन घेतलं. त्यानतंर हितेंद्र ठाकूर हे सुद्धा तिथे पोहोचले. बराच काळ चाललेल्या या गोंधळानंतर आता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे एकाच गाडीतून जेवायला गेल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT
1. विनोद तावडे यांना घेरलं
विनोद तावडे विरार पूर्वमध्ये असलेल्या विवांता या हॉटेलमध्ये थांबलेलें असताना तिथे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. या कार्यकर्त्यांनी तिथे पोहोचताच विनोद तावडे यांना सवाल करत गोंधळ करायला सुरूवात केली. यावेळी त्यांच्याकडे काही पैसे आणि डायरी सापडल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर यांनी संपूर्ण प्रकरणावरुन हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले. विनोद तावडे यांनी आम्हाला 25 फोन केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला असून, ते आपली माफी मागत होते आणि सोडून देण्याची विनंती करत होते असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा >>Eknath Shinde Shiv Sena : मतदानाच्या एक दिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाचा दणका
2. हितेंद्र ठाकूर स्वत: घटनास्थळी
हितेंद्र ठाकूर हे स्वत: विवांता हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विनोद तावडेंकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी इथे बराच वेळ गोंधळ झाला. तेव्हा तिथे भाजपच्या महिला पदाधिकारीही दाखल झाल्या. यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर दोघांची पत्रकार परिषद झाली. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केले, तर तावडे यांनी आपली बाजू मांडली.
3. हितेंद्र ठाकूर बाहेर आले
त्यानंतर दोन्ही नेत्यांनी बोलून झाल्यानंतर पत्रकार परिषद थांबवली. त्यानंतर हितेंद्र ठाकूर बाहेर आले. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर काही वेळानंतर विनोद तावडे हे सुद्धा बाहेर आले.
4. दोन्ही नेते सोबत जेवायला गेले.
विनोद तावडे हे खाली येऊन आपल्या कारमध्ये बसले. यादरम्यान पुन्हा एकदा विनोद तावडे कारमधून खाली उतरले आणि थेट हितेंद्र ठाकूर यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले. त्यानंतर क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे हे एकाच गाडीतून निघाले. त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की, विनोद तावडे आमचे मित्र आहेत, आम्ही जेवायला जातोय. तसंच मी आता पैसे मोजतो, उरलेले पैसे ते मला देऊन टाकतील असा मिश्किल टोलाही हितेंद्र ठाकूर यांनी लावला.
ADVERTISEMENT