मुंबई: केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी वरिष्ठ IPS अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणून नियुक्ती केली आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. कुलकर्णी यांना तात्काळ प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात यावं याबाबत महाराष्ट्र सरकारला स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.
एनआयएचे पोलीस महानिरीक्षक पद तात्पुरते एडीजी पदावर श्रेणीसुधारित करण्यात आले आहे. अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत करण्यात आली आहे.
अतुलचंद्र कुलकर्णी हे 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते पुण्यात अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा (कारागृह) म्हणून तैनात आहेत.
याआधी ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) तसेच मुंबईतील सह पोलीस आयुक्त (गुन्हे) होते. मुंबईत पोस्टिंग करण्यापूर्वी ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. आता या आदेशानंतर ते पुन्हा एकदा केंद्रात जाणार आहेत.
कैद्यांसाठी क्रीडा प्रशिक्षण सुरु करणारे अपर पोलीस महासंचालक
अतुलचंद्र कुलकर्णी हे पुण्यातील येरवडा तुरुंगाचे अपर पोलीस महासंचालक सुधारसेवा असताना त्यांनी कैद्यांसाठी वेगवेगळे उपक्रम सुरु केले होते.
येरवडा कारागृहातून चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत यासाठी त्यांनी काही तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक देखील केली होती. येरवडा कारागृहात त्यांनी कैद्यांसाठी क्रीडा प्रशिक्षण देखील केलं होतं. त्यामुळे अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याबाबत अनेक कैद्यांच्या मनात देखील आदर असल्याचं अनेक जण सांगतात.
दरम्यान, आता अतुलचंद्र कुलकर्णी हे NIA सारख्या अत्यंत महत्त्वाच्या तपास यंत्रणेच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणार असल्याने ते यावेळी या संस्थेत कशा पद्धतीने आपली छाप ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT