तंजावर (तमिळनाडू): तमिळनाडूतील तंजावर येथील कालीमेडू येथील एका मंदिरात विजेचा तीव्र झटका लागून तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक भाविक जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले होते.
ADVERTISEMENT
कालीमेडू येथील मंदिरात 94 वा अप्पर गुरुपूजा उत्सव साजरा केला जात आहे, मंगळवारी रात्रीपासूनच येथे आजूबाजूच्या परिसरातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
यादरम्यान बुधवारी सकाळी शहरातील रस्त्यांवर पारंपरिक रथयात्रा काढण्यात आली होती. देवाचा रथ ओढण्यासाठी शेकडो भाविकांमध्ये चढाओढ सुरू होती. यावेळी अचानक विजेचा प्रवाह सुरु असलेल्या तारेचा स्पर्श रथाला झाला आणि विजेचा तीव्र झटका लागून 2 मुलांसह 11 जणांचा जागीच मृत्यू झाला.
विजेचा धक्का लागून अनेक जण जखमी देखील झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहचलं आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं होतं.
दरम्यान ही दुर्घटना घडली त्याचवेळी खड्डे पडलेल्या रस्त्यावरुन हा रथ जात होता. त्यामुळे सुमारे 50 लोक रथापासून काहीसे दूर झाले होते. त्यामुळ मोठी जीवितहानी टळली.
दुर्घटनेबाबत पोलीस अधिकारी काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे, तसेच तीन गंभीर जखमींसह 15 जणांना तंजावरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.’ तिरुचिरापल्लीच्या मध्य विभागाचे पोलीस महानिरीक्षक व्ही बालकृष्णन यांनी अपघाताबाबत सांगितले की, ‘गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दुर्दैवी ! वीजेचा धक्का लागून बहिण-भावाचा मृत्यू, बीडमधली घटना
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तामिळनाडूतील घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तमिळनाडूतील तंजावर येथे झालेल्या दुर्घटनेने खूप दु:ख झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ‘या दु:खाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत. मला आशा आहे की, अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे होतील.’ असंही मोदी यावेळी म्हणाले. याशिवाय सर्व मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT