कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट मिळाली आहे. यामुळे एनसीबीचे तत्कालिन संचालक समीर वानखेडे मात्र अडचणीत आले आहेत. एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, केंद्राने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT
२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई एनसीबीच्या पथकाने मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी ड्रग्ज पार्टी करत असल्याचा दावा करत एनसीबीने काही जणांना ताब्यात घेऊन नंतर अटक केली होती. यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता.
दरम्यान, एनसीबीने या प्रकरणात ६ हजार पानांचं आरोपपत्र एनपीडीएस न्यायालयात सादर केलं. या आरोपपत्रात आर्यन खानसह जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे. पुरेसे पुरावे नसल्यानं गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, असं एनसीबीने स्पष्ट केलं आहे.
आर्यन खानला एनसीबीकडून क्लिन चिट मिळाल्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत या प्रकरणाची चर्चा सूरु झाली असून, तत्कालिन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
यावर एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी मोठं विधान केलं आहे. या प्रकरणात समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून मोठी चूक झाली असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे.
‘पूर्वीच्या टीमकडून चूक झाली नसती, तर एसआयटीकडे तपास कशाला गेला असता? काही उणीवा राहिल्या, त्यामुळेच एसआयटीकडे तपास दिला गेला. उणीवा दूर करून पुढील कारवाई अचूकपणे व्हावी म्हणूनच या उद्देशानेच तपास एसआयटी दिला होता,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
आरोपपत्रात आर्यन खानसह ६ जणांच्या नावांचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांच्यावर भविष्यात कारवाई होणार का याबद्दल प्रधान यांना विचारण्यात आलं. त्यावर एनसीबीचे महासंचालक म्हणाले, ‘हा चौकशीचा विषय आहे. जर पुरावे मिळाले, तर प्रकरण पुन्हा उघडलं जाऊ शकतं. त्याचबरोबर क्रूझवर छापेमारी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीही केली जाऊ शकते.’
सरकारने काय दिले निर्देश?
आर्यन खानला क्लिन चिट मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. केंद्राने संबंधित विभागाला एनसीबीचे तत्कालिन अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT