शिवसेना नेतेपदी निवड होताच भास्कर जाधवांचा संकल्प; महाविकास आघाडीचा नाही पण…

मुंबई तक

• 10:05 AM • 29 Aug 2022

राकेश गुडेकर, प्रतिनिधी शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी राज्यभर दौरे करण्याचा संकल्प केला आहे. महाविकास आघाडी म्हणून नाही पण शिवसेनेचा नेता म्हणून आपण राज्यभर दौरे करणार असल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत. कोकणात शिंदे गटाचा काही परिणाम होणार नाही. एखादं नवीन दुकान झालं की कुतूहल म्हणून लोक त्या दुकानात जातात आणि माघारी येतात असे […]

Mumbaitak
follow google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

हे वाचलं का?

शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी राज्यभर दौरे करण्याचा संकल्प केला आहे. महाविकास आघाडी म्हणून नाही पण शिवसेनेचा नेता म्हणून आपण राज्यभर दौरे करणार असल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत. कोकणात शिंदे गटाचा काही परिणाम होणार नाही. एखादं नवीन दुकान झालं की कुतूहल म्हणून लोक त्या दुकानात जातात आणि माघारी येतात असे म्हणत शिंदे गटावर उपहासात्मक टीका केली आहे.

भास्कर जाधवांनी घेतला भरत गोगावलेंच्या वक्तव्याचा समाचार

भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत सुप्रीम कोर्टाचा रखडलेला निकाल हा केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्वाचा आहे असे मानता येणार नाही, कारण कोर्टाच्या निकालावर देशातील लोकशाही, संघराज्य, पक्षांतर बंदी कायदा अबाधित राहील की नाही हे स्पष्ट करणारा आहे. त्यामुळे हा निकाल लवकरात लवकर लागणे गरजेचे आहे. शिंदे गटाच्या मागे महाशक्ती उभी असल्याचं त्यांनीच म्हटलं आहे, त्यामुळे ही महाशक्ती देशात काय प्रताप करते याचे परिणाम सर्वानाच भोगावे लागणार आहेत असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.

सावंत, जाधव, डाके निष्ठावंतांवर उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटनेत काही बदल केले होते. यामध्ये खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी वर्णी लागली. तर शिवसेनेचे जेष्ठ नेते लीलाधर डाके यांचे पुत्र पराग डाके यांना पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही निष्ठावंत राहिलेल्या मावळ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे तर डाकेंसारख्या जेष्ठांचीही काळजी घेण्यात आली आहे.

भाजप नेहमी खोटं बोलत आलं आहे- भास्कर जाधव

राजापूरमधील रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रव्यवहार केल्याचे भाजप आधीपासूनच म्हणत आहे, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आता भाजपची असल्याचं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलंय. शिवसेनेची बदनामी करण्यासाठी भाजप नेहमी खोटं बोलत आलं आहे….त्यामुळे एकदा लोकांसमोर येऊन या प्रकल्पाच्या गुंतवणूकीबद्दल लोकांना खरं सांगावं आणि हा प्रकल्प उभा करावा असेही भास्कर जाधवांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp