एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रीया पार पडली आहे. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा संदर्भ घेत, सोनिया गांधींसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लागल्याचं नितेश राणे म्हणाले.
ADVERTISEMENT
नुसतं ठाकरे नाव लावलं म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तुम्ही कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नका अशा शब्दांत नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपांला पाठींबा देण्यासाठी आलेल्या नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. भाजप आंदोलन पेटवत असल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला होता. त्यावर बोलताना राणे यांनी, मागील आठ वर्षांपासून शिवसेनेकडेच हे खाते होते याची आठवण करून दिली. हे आंदोलन कर्मचाऱ्यांचेच आंदोलन असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. कोरोना काळात मुख्यमंत्री घरात बसून होते, त्यावेळी माझा कामगार एसटी घेऊन रस्त्यावर होता असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केलं.
अनिल परब यांच्यावर टीका करताना नितेश राणेंची जीभ यावेळी घसरलेली पहायला मिळाली. आमच्या मातीतून असा कार्टा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे असं म्हणत राणेंनी परबांवर टीका केली. मागील आठ वर्षांपासून परिवहन खाते हे शिवसेनेकडे आहे. या कालावधीत तुम्ही काय केले, असा सवाल नितेश राणे यांनी केला. मंत्रालयातील स्वत: च्या कार्यालयात बसून बोलू नये. एकदा आझाद मैदानात या असे आव्हान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. विलीनीकरण झालं तर कर्मचाऱ्यांचं हित आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांची दुकानदारी बंद होईल असा दावा राणे यांनी केला.
ADVERTISEMENT