आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार मनिष भानुशालीला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. मनिष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता आहे. कल्याण डोंबिवलीतून त्याने निवडणूकही लढवली होती. सध्या आर्यन खान प्रकरण मोठ्या प्रमाणावर देशभरात गाजतं आहे. मात्र या प्रकरणात आता समीर वानखेडे आणि के.पी. गोसावी यांच्यावर खंडणीचे आरोप झाले आहेत.
ADVERTISEMENT
हे आरोप एनसीबीचे साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केले आहेत. के. पी. गोसावींनी हे आरोप फेटाळले आहेत. तसंच समीर वानखेडेंनीही या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. प्रभाकर साईलच्या आऱोपांमुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला. अशात भ्रष्टाचाराचे जे काही आऱोप झाले त्याची चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जाते आहे. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. अशात आता क्रूझ शिप प्रकरणात काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई पोलीस दलातील चार अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यामुळे आता यासंबंधी मनिष भानुशालीला समन्स पाठवण्यात आलं आहे.
रविवारी प्रभाकर साईलने असा आरोप केला की आर्यन खानला पकडल्यानंतर त्याला सोडण्यासाठी के.पी. गोसावीने शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली. एवढंच नाही तर त्यातले आठ कोटी हे समीर वानखेडेंना मिळणार होते. प्रभाकर साईल हा के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार क्रमांक एक आहे. त्याने हे वक्तव्य केल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी करण्याचं ठरवलं असून चार अधिकारी ही चौकशी करणार आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे या चौकशीवर लक्ष ठेवून असणार आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा आदेश दिला आहे.
गोसावींना क्रूझ छाप्याच्या आधी भेटलो होतो, समीर वानखेडे खूप चांगले अधिकारी-मनिष भानुशाली
प्रभाकर साईल हा इतके दिवस समोर आला नव्हता. मात्र रविवारी तो मीडियासमोर आला. तसंच त्याने आपल्याला समीर वानखेडेंपासून जिवाचा धोका आहे असाही आरोप केला. एवढंच नाही तर या प्रकरणातला एक दुसरा साक्षीदारही आज असेच आरोप करतो आहे.
मनिष भानुशालींनी नवाब मलिकांच्या आरोपांना काय उत्तर दिलं होतं?
मनिष भानुशाली यांच्यााशी मुंबई तकने संवाद साधला त्यावेळी मनिष भानुशाली म्हणाले की, ‘मला थोडी माहिती मिळाली होती. ती माहिती ड्रग्ज पार्टीबद्दल होती. ड्रग्जचा विळखा तरूण पिढीला कमकुवत बनवतो आहे. हे कोण लोकं आहे त्यांना पकडलं पाहिजे या उद्देशाने मी NCB ला यासंदर्भातली माहिती दिली. या लोकांना पकडलं पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे म्हणून मी ही माहिती NCB ला दिली. त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर कारवाई केली.’
तुम्ही तिथे रेड करताना गेला होतात का? असं विचारलं असता भानुशाली म्हणाले की, ‘आम्ही त्यांना पकडलं नाही. सगळी कारवाई NCB ने केली. मी सोबत चाललो होतो, आम्हाला जी माहिती मिळाली होती ती साक्षही नोंदवायची होती म्हणून आम्ही गेलो होतो. देशहिताचं जे काम आहे ते आम्ही केलं. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही’ असंही भानुशाली यांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT