रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं समोर आलं आहे. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार, केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांनाही धमक्या मिळत आहेत. त्याचप्रमाणे त्याचा मोबाईल नंबर लीक झाला असल्याचंही सिद्धार्थचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
अभिनेता सिद्धार्थच्या सांगण्याप्रमाणे, “माझा मोबाईल नंबर लीक झाला आहे. ज्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतायत. तसंच फोन करून मला अपशब्द वापरले जातायत.” भाजपच्या तामिळनाडू आयटीसेलकडून नंबर लीक करण्यात आल्याचा आरोप सिद्धार्थने केला आहे.
ट्विटरद्वारे सिद्धार्थने यासंदर्भात माहिती दिली आहे. तो त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “माझा फोन नंबर तामिळनाडू भाजपा आणि तामिळनाडू भाजपा आयटी सेलकडून लीक केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला आतापर्यंत 500 हून अधिक शिव्या, मृत्यूच्या धमक्या आणि बलात्काराशी संबंधित फोन आले आहेत. मी सर्व नंबरांची नोंद करून ठेवली आहे. यामध्ये भाजपा आणि डीपीच्या लिंकचाही समावेश आहे. याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे. मी शांत राहणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा.” याचसोबत सिद्धार्थने हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग केलं आहे.
सिद्धार्थने ट्विटरवर एक स्क्रिनशॉट शेअर केलाय. त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देखील दिली जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. तो ट्विटमध्ये म्हणतो, “काही सोशल मीडिया पोस्टपैकी ही एक पोस्ट आहे. ज्यामध्ये तामिळनाडूच्या भाजपा सदस्यांनी माझा फोन नंबर लीक केलाय. आणि लोकांना माझ्यावर अटॅक करण्यास सांगण्यात येतंय. आपण कोविड- 19 बरोबर लढाई लढू शकतो, पण अशा लोकांशी लढा देऊन आपण युद्ध जिंकू शकू का?”
ADVERTISEMENT