केएमटी बसचा ब्रेक फेल, 70 प्रवाशांचा जीव टांगणीला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

मुंबई तक

13 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:08 AM)

– दिपक सूर्यवंशी, कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या 70 प्रवाशांनी आज काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय घेतला. नाना पाटील नगर ते पेठ वडगाव मार्गावर धावणाऱ्या महापालिकेच्या बसचा ब्रेक फेल झाला. परंतू यावेळी बसचालक एस.बी.संत यांनी प्रसंगावधान दाखवून बस डिव्हाईडरवर चढवल्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. जाणून घ्या काय घडलं […]

Mumbaitak
follow google news

– दिपक सूर्यवंशी, कोल्हापूर प्रतिनिधी

हे वाचलं का?

कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या 70 प्रवाशांनी आज काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय घेतला. नाना पाटील नगर ते पेठ वडगाव मार्गावर धावणाऱ्या महापालिकेच्या बसचा ब्रेक फेल झाला. परंतू यावेळी बसचालक एस.बी.संत यांनी प्रसंगावधान दाखवून बस डिव्हाईडरवर चढवल्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

जाणून घ्या काय घडलं आज कोल्हापुरात?

कोल्हापूर शहरातील रस्त्यावर आज नेहमीप्रमाणं वर्दळ होती. दरम्यान नाना पाटील नगरहून पेठ वडगावच्या दिशेनं निघालेली बस महाराणा प्रताप चौकात येऊन थांबली. थांब्यावरील प्रवासी घेतल्यानंतर चालक एस.बी. संत यांनी बस पुढच्या रस्त्यावर मार्गस्थ केली. परंतू काही क्षणातच संत यांना बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात आलं. क्षणार्धात संत यांच्या डोळयासमोर काजवे चमकले.

बस नियंत्रणात आली नाही तर, ७० प्रवाशांना इजा तर होईलच, पण रस्त्यावरील पादचारी, वाहनं आणि त्यातील प्रवाशांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

प्रसंगावधान राखून चालकाने बस डिव्हाईडरवर चढवली आणि अपघात टळला –

अशा प्रसंगात कोणत्याही व्यक्तीचा धीर खचला असता. परंतू संत यांनी मनोधैर्य एकवटून स्वतःला सावरलं. बस स्वयंभू गणेश मंदिर चौकातील सिग्नलजवळ आली असता तिकडे वाहनांची मोठी गर्दी दिसली. संत यावेळी गिअरवर बस कंट्रोल करत ती थांबवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी समोरील टेम्पोला बसची धडक बसली. हीच संधी साधत संत यांनी बस रस्त्याच्या दुभाजकावर चढवली.

बसचा वेग जसा मंदावला तसं संत यांनी बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कडेला नेऊन थांबवली. हा सर्व प्रकार सुरु असताना बसमधील प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. परंतू बस ज्याक्षणी दुसऱ्या बाजूला येऊन थांबली तसे सर्व प्रवासी बाहेर पडले. चालक संत यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे बसमधील एकाही प्रवाशाला कसलीही जखम झाली नाही आणि होऊ शकणारी जिवीतहानी टळली.

    follow whatsapp