सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर अनुदान जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे एकत्रितपणे बॅनर लावले आहेत. तसंच पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्याबद्दल आभार मानून ‘एकदम ओके’ असाही उल्लेख केला आहे. या बॅनरची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्जधारकांना पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहन देण्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर सरकार जात असताना त्याबाबत घाई-गडबडीत घोषणा करण्यात आली होती. तसेच १० हजार कोटींची तरतुदही करुन अध्यादेशही काढला होता. मात्र कार्यवाही झाली नव्हती. याबाबत राजू शेट्टी यांनी अनेकदा आवज उठवला होता. मात्र त्याबाबत दखल घेतली गेली नव्हती.
त्यानंतर नवीन शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतरही या घोषणेची कार्यवाही रखडली होती. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याच नेतृत्वात १३ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे भर पावसात मोर्चा काढला होता. त्यावेळी शिंदे सरकारने दिवाळीपुर्वी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
अखेरीस कालपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची मनात समाधानची भावना आहे. शामराव शिंदे या शेतकऱ्यानं ‘मुंबई तक’शी बोलताना दिवाळी गोड झाली असल्याची भावना व्यक्त केली. सोबतच राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आले म्हणून आम्ही हे बॅनर लाऊन दोघांचेही आभार मानतं असल्याचं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT