मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांची अवघ्या एका महिन्यात दुसरी मागणी मान्य केली आहे. गुरुवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांनी यांनी मान्यता दिली. तसंच तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या. बच्चू कडू यांनीही या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
यापूर्वी याच महिन्याच मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या आचलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला तब्बल 495 कोटींचा निधी दिला होता. या प्रकल्पामुळे 6 हजार 134 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. स्वतः बच्चू कडू यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली होती. यानंतर बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना हे रिटर्न गिफ्ट दिलं असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. अशातच आता आमदार कडू यांची दिव्यांगासाठीच्या स्वतंत्र मंत्रालयाची मागणी मान्य करत त्यांना दुसरे गिफ्ट दिलं आहे.
बच्चू कडू – रवी राणा वाद :
आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले असं विधान रवी राणांनी केलं होतं. त्यावरून बच्चू कडू आक्रमक झाले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी म्हणत बच्चू कडूंनी थेट वेगवेगळा विचार करू असा इशाराच दिला होता. त्यानंतर हा वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यांनीही वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेत दोघांमध्ये समेट घडवून आणला होता.
शिंदे-फडणवीसांसोबत चर्चेनंतर राणांनी मागितली माफी
रविवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रवी राणा आणि बच्चू कडू यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर सोमवारी सकाळी रवी राणा यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणा यांनी विधान मागे घेत माफी मागितली. रवी राणा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस हे अनेक अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढत असतात. या प्रसंगातूनही त्यांनी मार्ग काढला. त्यांचा आदेश पाळत मी दुखावलेल्या नेत्याची माफी मागतो.”
ADVERTISEMENT