मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात विकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून कोरोनाची साखळी मोडण्यासाठी Break the Chain या नवीन उपक्रमाअंतर्गत नवे निर्बंध घालून देण्यात आले आहेत. ज्यात गर्दी होणारी सर्व ठिकाणं ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत. परंतू मुख्यमंत्र्यांच्या या आदेशालाच उस्मानाबाद परिसरात सर्रास वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या पहायला मिळाल्या. तुळजाभवानी मंदीर परिसरातील दुकानं सर्रास उघडण्यात आली असून यावेळी व्यापारी-पुजारी हे सहज विनामास्क फिरताना आढळले. यावेळी मंदीर परिसरात लोकांनी गर्दी करुन जमावबंदीच्या नियमांचं उल्लंघनही केलं.
ADVERTISEMENT
राज्यातील सर्व मंदीर भाविकांसाठी बंद करण्यात आली असली तरीही तुळजाभवानी मंदीर परिसरात पुजा साहित्य विक्रीची, चहाची दुकानं उघडण्यात आली. या दुकानांवर भाविकांनी सकाळीच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पावलोपावली पायदळी तुडवले जात होते. महत्वाची गोष्ट म्हणजे मंदीर प्रशासन, पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात कोणतीही कारवाई करताना दिसले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही जर प्रशासन एवढ्या ढिलाईने वागत असेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा आटोक्यात आणायचं असा प्रश्न आता विचारला जात आहे.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं, आठवडी बाजार, बाजारपेठा, मॉल्स बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतू स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात संचारबंदी लागू आहे. तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदी आणि विकेंड लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार असल्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. परंतू तुळजाभवानी मंदीर परिसरात या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वाधिक नवीन ४२३ रुग्ण सापडले व २ जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णाची संख्या २ हजार ५२२ आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर १ लाख ६४ हजार १७२ नमुने तपासले त्यापैकी २२ हजार १२८ रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर १७.१५ टक्के आहे. जिल्ह्यात १८ हजार ९४७ रुग्ण बरे झाले असून ८५.६२ टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे. तर २.७३ टक्के मृत्यू दर आहे.
२५ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती
ADVERTISEMENT