राकेश गुडेकर, रत्नागिरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि भाजप आमदार नितेश राणे यांचं नाव न घेता दोघांनाही खडेबोल सुनावले आहेत. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘म्यॉव, म्यॉव’ आवाज काढत मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचलं होतं. तर त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर करुन नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. याच सगळ्या वादावरुन आता अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांना सुनावलं आहे. रत्नागिरी जवळच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या जाहीर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
ADVERTISEMENT
अजित पवारांनी काय सुनावलं?
अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे नेते आहोत. सध्या सोशल मीडियावरून कोण कोंबड्याला मांजर करतंय तर कुणी मांजराला कोंबडा करतंय. यातून कोकणच्या विकासाचे मुद्दे सुटणार आहेत का? हे असं कुणीच करू नये.’
असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना खडे बोल सुनावले आहेत.
‘एकमेकांची उणीदुणी काढून काही होणार नाही, आपण विकासावर काय ते बोललं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्याला आई वडिलांनी जन्म दिल्याचं सार्थक होईल.’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांना टोला लगावला आहे.
नेमका वाद काय होता?
शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे 23 डिसेंबर रोजी जेव्हा अधिवेशनासाठी विधानसभेत आले होते तेव्हा भाजपचे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत होते. त्याचवेळे आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणे यांनी ‘म्यॉव, म्यॉव’ असा आवाज काढून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.
आदित्य ठाकरे सभागृहाकडे त्याच पायऱ्यांवरून जात होते जिथे विरोधी आमदार निदर्शने करत होते. ‘आम्ही तिघे भाऊ भाऊ, सगळा माल वाटून खाऊ’ अशा घोषणा भाजपचे आमदार पायऱ्यांवर बसून देत होते. अशातच नितेश राणे यांची नजर आदित्य ठाकरेंवर पडली. आदित्य ठाकरे यांना पाहून नितेश राणेंनी ‘म्याव म्याव’ असा मांजरीचा आवाज काढायला सुरुवात केली. पण आदित्य ठाकरेंनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते विधिमंडळात दाखल झाले.
अधिवेशनात आदित्य ठाकरेंची एंट्री, नितेश राणेंनी म्यॉव म्यॉव आवाज काढत डिवचलं
नितेश राणेंनी अशा प्रकारे आदित्य ठाकरेंना डिवचल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी कोंबड्याला मांजरीचं तोंड लावलेला फोटो शेअर करुन त्याला ‘पैहचान कौन?’ असं कॅप्शन दिलं होतं.
मात्र, आता या सगळ्या वादावरुनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीतील एका कार्यक्रमात बोलताना दोन्ही नेत्यांना खडे बोल सुनावले.
ADVERTISEMENT