मुंबईचा एक अविभाज्य घटक असलेला डबेवाला हा गेल्या वर्षभरापासून हवालदिल झाला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे लॉकडाऊन. मात्र मुंबईला त्याने आपलं मानलं आहे वादळाच्या तडाख्यातही दिसून आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे डबेवाल्यांची आजही म्हणजे वादळ आलेलं असतानाही सुरू असलेली डबे पोहचवण्याची सेवा. मुंबईतल्या डॉक्टरांसाठी, कोरोना रूग्णांसाठी, मेडिकल सेवा पुरवणाऱ्यांसाठी हे डबेवाले भर वादळातही डबे पुरवत आहेत.
ADVERTISEMENT
भर वादळात आणि पावसापाण्याचे तुम्ही डबे घेऊन कुठे जात आहात असं जेव्हा मुंबई तकने बाळू पिसाळ यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘मला कुटुंब चालवण्यासाठी डबे पोहचवणं आवश्यक आहेच. मात्र मी सध्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस आणि डॉक्टरांना तसंच कोरोना रूग्णांना डबे पोहचवतो आहे. काही रूग्ण एकाकी आहेत त्यांनाही मी डबे पुरवतो आहे. मी जर आज सुट्टी घेतली तर त्या सगळ्यांची गैरसोय होईल. त्यामुळे वादळाची चिंता न करता मी कामावर आलो आहे.’
सोपान मदगे यांनाही मुंबई तकने विचारलं असता ते म्हणाले की आम्ही ऑफिस आणि व्यवसायच्या ठिकाणी डबे पोहचवतो. मात्र ते काम सध्या बंद आहे. जे लोक तीन दिवस सुट्टी न घेता काम वैद्यकीय सेवेसाठी झटत आहेत, तसंच जे अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आहेत त्यांना डबा कोण देणार? त्यामुळे वादळ पाऊस यांची चिंता न करता आमच्या कामासाठी निघालो आहोत.’
Mumbai तल्या डबेवाल्यांवर कोरोनामुळे आर्थिक संकट.. आता अपेक्षा सरकारी मदतीची
मुंबईचा डबेवाला हा मुंबईच्या असंख्य लोकांना जेवण पुरवण्याचं काम करणारा. उन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता हे डबेवाले मुंबईकरांसाठी झटत असतात. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यापासून मात्र या डबेवाल्यांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. अनेक डबेवाल्यांनी गावी जाणं पसंत केलं आहे कारण त्यांच्यापुढे काही पर्याय उरलेला नाही. जे डबेवाले मुंबईत आहेत ते सध्या मिळेल ते काम करत आहेत. सरकारकडून त्यांनी मदतीची अपेक्षा ठेवली होती खरी मात्र ती त्यांना मिळालेली नाही. आज कोरोना काळात मुंबईचा वेग प्रचंड मंदावला आहे त्याचा फटका या डबेवाल्यांनाही बसलाच आहे. मात्र आज वादळ आहे पाऊस पडतो आहे, सोसाट्याचा वारा सुटला आहे तरीही कशाचीही पर्वा न करता मुंबईतला डबेवाला कोरोना रूग्ण, डॉक्टर, नर्सेस, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांच्यासाठी डबे घेऊन गेला. मुंबईच्या या डबेवाल्यांनी आपल्या मनात मुंबई आणि मुंबईकरांसाठी असलेलं प्रेम आणि आपुलकी ही पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
ADVERTISEMENT