मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारची काल मंत्रिमंडळ बैठक पार पाडली यामध्ये सरकारनं अनेक निर्णय घेतले. यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना सुनावल्याची चर्चा आहे. लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारचे काही निर्णय परस्पर जाहीर केल्यामुळं फडणवीस सत्तारांवर चांगलेच संतापले होते. तसंच यापुढे परस्पर निर्णय जाहीर करु नका असे आदेशही फडणवीसांनी सत्तार आणि इतर मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या सर्व नाट्यानंतर मंत्र्याना समज दिली आहे.
ADVERTISEMENT
कोणत्या योजनेवरुन देवेंद्र फडणवीसांनी सत्तारांना सुनावले?
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना राबवण्याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. अगदी त्याचवेळी ही माहिती माध्यमांमध्ये लीक झाली. त्यामुळे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची गंभीर दखल घेत मंत्रिमंडळ बैठकीतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना जाब विचारला. त्यानंतर बैठकीतील सर्व मंत्र्यांना ताकीद दिली.
अब्दुल सत्तार तुम्ही माहिती जाहीर कशी केली?- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ बैठकीतच थेट विचारणाच केली. शेतकरी सन्मान योजनेबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली?. फडणवीसांनी सुनावल्यानंतर मुंख्यमंत्र्यांनीही अब्दुल सत्तारांना चांगलंच सुनावले. त्यानंतर अब्दुल सत्तारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सत्तार म्हणाले, ”आपण निर्णय झाल्याचे माध्यमांना सांगितले नाही, तर विचार सुरू असल्याचेच सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांचे समाधान झाले नाही, त्यानंतर त्यांनी सर्वच मंत्र्यांना ताकीद दिली.
देवेंद्र फडणवीसांची मंत्र्यांना सक्त ताकीद
”एखाद्या योजनेचा विचार सुरु असताना तो जाहीर केल्यानंतर त्याचं महत्त्व निघून जातं. कोणताही निर्णय जाहीर करण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आहेत. एखाद्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजूरी दिल्याशिवाय अशा परस्पर घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा.” अशी ताकीद उपमुख्यमंत्र्यांनी सत्तारांसह इतर मंत्र्यांनाही दिली आहे.
ADVERTISEMENT