विधानपरिषदेच्या उप-सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्र सरकारने परदेशात लस वितरीत करायला नको होती. जगातले इतर देश आणि आपल्या नागरिकांना लस देतात मात्र केंद्राने Vaccine Diplomacy च्या माध्यमातून परदेशात लस दिली ज्याचा फटका राज्याला बसत असल्याची टीका गोऱ्हे यांनी केली.
ADVERTISEMENT
नीलम गोऱ्हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी विविध शासकीय विभागांसोबत आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर पक्ष संघटनेचा आढावा देखील जाणून घेतला. यानंतर अजिंठा शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्या बोलत होत्या.
केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळेच राज्यात लसीकरणाची गती संथ असल्याचंही निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली, त्यापूर्वी केंद्राने परदेशात लस वितरीत करायला नको होती असंही निलम गोऱ्हे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केलं.
“चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते आपापल्या पक्षांचे प्रमुख आहेत. दोन स्वतंत्र पक्षांच्या प्रमुखांची भेट होणे हे राज शिष्टाचाराचा भाग आहे. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. तसेच राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य देखील नसते. शेवटी दोघांच्या भेटीबाबत एकच सांगते की, या भेटीने राजकीय उत्सुकतेची कहाणी सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा.”
ADVERTISEMENT