मिथीलेश गुप्ता
ADVERTISEMENT
डोंबिवली: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कॉल केला आणि त्याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात नव्याने रंगू लागली आहे. यावरुन मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी जवळीक होऊ शकते, परंतू सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचाच असल्याचे सूचक विधान केले आहे. मनसे भाजपच्या युतीची चर्चा असताना, मनसे व शिंदे गट युती होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याचे पडसाद स्थानिक पातळीवर देखील उमटण्याची शक्यता असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असा सामना रंगला आहे. शिंदे हे आपला गट एखाद्या राजकीय पक्षात विलीन करतील अशी चर्चा आहे. त्यातच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे. याविषयी मनसेचे एकमेव आमदार व विधानसभा निवडणूकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
याविषयी बोलताना आमदार पाटील म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून मी राज साहेबांच्या संपर्कात नाही. प्रसार माध्यमांच्या मार्फतच मला हे समजले आहे की राज साहेब यांना एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्यांचे पहिल्यापासून एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मध्ये काही नेतृत्वाच्या अडचणी असतील त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. यावेळी त्यांनी एक कॉल केला असेल. सध्या जे राजकारण सुरु आहे, ते पाहता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा अंतर्गत वाद आहे. त्यामुळे या घडीला आम्हाला त्याच्यात काही रस नाही.
शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला याला अनेक कारणे आहेत. परंतू त्यातील एक कारण म्हणजे त्यांनी सांगितलेला हिंदूत्वाचा मुद्दा. जो मुद्दा आम्ही राज साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जात आहोत. हे काही कॉमन मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने जवळीक होऊ सुद्धा शकते. परंतु सर्वस्वी निर्णय हा राज साहेबांचा असून त्यावर मी काही भाष्य करु इच्छित नाही असे पाटील यांनी सांगितले.
ADVERTISEMENT