टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार अपघातात मृत्यू झाला. ते गुजरातमधील उदवाडा इथं पारसी धर्माच्या धार्मिक स्थळाचं दर्शन घ्यायला गेले होते. तिथून परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांच्यावर ६ सप्टेंबरला वरळीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायरस मिस्त्री हे पारसी धर्माचे असले तरी त्यांच्या पार्थिवावर वरळी इथल्या स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
ADVERTISEMENT
पारसी धर्मात अंत्यसंस्काराची वेगळी प्रथा काय आहे?
पारसी धर्मात अंत्यसंस्काराची एक वेगळी प्रथा आहे. या धर्मात अंत्यसंस्कार नेमके कसे केले जातात? हेच आपण जाणून घेणार आहोत.
प्रत्येक धर्मानुसार अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. काही धर्मात मृतदेहाला अग्नी दिला जातो, तर काही धर्मांमध्ये मृतदेह दफन केला जातो. पण, पारसी धर्मात मृतदेह ना दफन केला जात, ना त्याला अग्नी दिला जात. या धर्मात अंत्यसंस्काराची एक वेगळी पद्धत आहे. मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी सोडला जातो. या प्रथेला दोखमेनाशिनी म्हणतात.
काय आहे दोखमेनाशिनी प्रथा?
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की मृत व्यक्तीचं शरीर दोखमेनाशिनीसाठी एकांतात नेलं जातं. या धर्माची स्वतंत्र अशी स्मशानभूमी असते. त्याला टॉवर ऑफ सायलेन्स म्हणतात. टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे शहराच्या बाहेर शांत ठिकाणी विहिरीसारखं गोलाकार बांधकाम असतं. मधोमध रिकामी जागा असते. त्याठिकाणी मृतदेह ठेवला जातो जेणेकरून त्यावर सूर्याची किरणं पडतील. त्यानंतर गिधाडं येऊन हा मृतदेह खातात. पारसी धर्मात पृथ्वी, आग आणि पाण्याला पवित्र मानलं जातं. म्हणजेच पंचमहाभूतांना ते देव मानतात. त्यामुळे त्यामुळे मृतदेहाला ना अग्नी दिला जात, ना तो दफन केला जातो. तर हा मृतदेह आकाशाला समर्पित करतात, असं या धर्मातील जाणकार सांगतात.
मुंबई आणि गुजरातमध्ये पारसी समाज मोठ्या प्रमाणावर
भारतात मुंबई आणि गुजरातमध्ये पारसी समाज जास्त आहे. मुंबईत मलबार हिल इथं टॉवर ऑफ सायलेन्स आहे. पण, काळानुसार गिधाडांची संख्या कमी होत चालली. त्यामुळे पारसी समाजाला अंत्यविधीसाठी अडचण येते आहे. आता पारसी धर्मातील लोकांना अंत्यसंस्कारासाठी विद्युतदाहिनीसारख्या मानवनिर्मित साधनांचा वापर करावा लागतोय, असं पारसी धर्मातील जाणकार सांगतात.
कोरोना काळात कोरोना मृतांवर टॉवर ऑफ सायलेंस पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्याची मागणी पारसी लोकांनी केली होती. पण, या प्रथेमुळे कोरोनाचं संक्रमण अधिक पसरण्याची शक्यता होती. त्यामुळ कोरोनाच्या काळात पारसी धर्मातील अंत्यंसंस्काराच्या प्रथेवर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली होती.
२०१९ मध्ये समोर आलेल्या एका अहवालानुसार पारसी समाजातील व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाल्यास त्याचा मृतदेह मुंबईहून सुरतला न्यावा लागत असे. तूर्तास ही प्रथा बदलण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पारसी समाजाचे लोक आता हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याला प्राधान्य देत आहेत. प्रथा बदलण्यास हे लोक तयार नाहीत मात्र दुसरा काही पर्याय तूर्तास त्यांच्या समोर उरलेला नाही. २००७ नंतर आलेल्या एका अहवालानुसार गिधाडांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पारशी समाजातील अंत्यसंस्काराची प्रथा त्यांना बदलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
ADVERTISEMENT