दोन दिवसांत महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारं तौकताई वादळ आता गुजरातमध्ये धडकलं आहे. गुजरातच्या किनारपट्टी भागात असलेल्या अनेक भागांना या वादळाचा तडाखा बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील वादळाचा तडाखा बसलेल्या भागांची पाहणी केली.
ADVERTISEMENT
मोदींच्या गुजरात दौऱ्यावरुन आता महाराष्ट्रात एका नवीन राजकारणाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच वादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसला होता, पंतप्रधानांनी या भागांचा दौरा का नाही केला? हा भेदभाव नाही का? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात आलेल्या तौकताई Tauktae चक्रीवादळाने हाहाकार माजवला. या वादळामुळे महाराष्ट्रात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध 11 हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर 10 हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे. आत्तापर्यंत 13 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातकडे मार्गस्थ झालं असलं तरीही या वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोनाचं संकट सहन करणाऱ्या राज्याला आता या वादळाच्या संकटाचाही सामना करावा लागला आहे.
ADVERTISEMENT