Jitendra Awhad latest news : राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर जितेंद्र आव्हाड समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आहेर यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आहेर यांनी फिर्यादी दिली होती.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना कार्यालयाबाहेरच मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी (15 फेब्रुवारी) घडला. या घटनेत आहेर यांच्या चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत.
या प्रकरणी महेश आहेर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आहेर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड, अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि इतर 3 कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आव्हाड, ‘ती’ ऑडिओ क्लिप अन् सहाय्यक आयुक्तांना मारहाण
महेश आहेर यांनी तक्रारीत काय म्हटलंय?
महेश आहेर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, “15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास ठाणे महापालिकेच्या गेट क्रमांक 4 जवळ मोबाईलवर बोलत होतो. त्याचवेळी विक्रम खामकर यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा तसेच जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघातील बेकायदा बांधकाम तोडल्याच्या रागातून जितेंद्र आव्हाड यांचे पीए अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व इतर 3 जणांनी ‘तुला आव्हाड साहेबांनी संपवायला सांगितलं आहे,’ म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने चॉपरने मारहाण केली. सुरक्षा रक्षक येताना दिसल्यानंतर पळून गेले. पळून जाताना आरोपींनी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली.”, असं म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कोणती कलमं लावण्यात आली आहेत?
आहेर यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांचे पीए अभिजीत पवार, हेमंत वाणी व विक्रम खामकर आणि इतर 3 जणाविरुद्ध कट रचून आहेर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भादंवि 307 कलमाबरोबरच 120(ब), 353, 332, 506(2), 143, 148, 149, आर्म अॅक्ट 3/25, 4/25 कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश आहेर विरुद्ध जितेंद्र आव्हाड : प्रकरण काय?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. हा व्हिडीओ ट्विट करताना ठाणे महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त महेश आहेर यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. या ट्विटनंतर एक ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर महेश आहेर आणि आव्हाडांमधील वाद वाढला.
व्हायरल झालेला कथित ऑडिओ हा महेश आहेर यांचा असल्याचं म्हटलं जातं आहे. ऑडिओतील संभाषणात जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. ही ऑडिओ क्लिप महेश आहेर यांचीच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांच्यावर ठाणे महापालिकेच्या कार्यालयासमोरच हल्ला केला. कार्यकर्त्यांनी आहेर यांना मारहाण केली.
ADVERTISEMENT