आमिर खान आणि करीना कपूर या दोघांच्या मुख्य भूमिका असलेला लालसिंग चढ्ढा हा सिनेमा ११ ऑगस्टला रिलिज होतो आहे. या सिनेमाची बरीच चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे. हा सिनेमा आधी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणाने त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रिलिज होतो आहे. अशात #BoycottLalsinghChaddha हा ट्विटर ट्रेंड होतो आहे. याबाबत आमिर पाठोपाठ करीनानेही मौन सोडलं आहे.
ADVERTISEMENT
आमिर खानने लालसिंग चढ्ढाच्या ट्विटर ट्रेंडबाबत काय म्हटलं होतं?
आमिर खानचं म्हणणं होतं की सिनेमा बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एकटा अभिनेता नाही तर एका पूर्ण टीमची मेहनत त्यामागे असते. रिलिजची डेट जवळ आलेली असताना अशा प्रकारच्या गोष्टी घडणं हे वेदनादायी आहे. या देशातले काही लोक असं समजतात की माझं या देशावर प्रेम नाही. पण तसं मुळीच नाही. माझं देशावर आणि देशातल्या नागरिकांवर खूप प्रेम आहे. मी सर्वांना विनंती करेन की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा.
आमिर खानचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर आता अभिनेत्री करीना कपूरनेही याबाबत मौन सोडलं आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे हे म्हणत असतानाच करीनाने एक महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.
काय म्हटलं आहे करीना कपूरने लालसिंग चढ्ढा या सिनेमाबाबत?
नेटकऱ्यांना विनंती करत करीना म्हणते, “कृपया आमच्या सिनेमावर बहिष्कार टाकू नका. तो सिनेमा आधी थिएटरमध्ये जाऊन बघा. आजच्या काळात प्रत्येकाचं मत वेगळं असतं. प्रत्येकजण आपल्या आवाजात व्यक्त होतो. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्सही त्यासाठी उपलब्ध आहेत. असंच होणार असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं शिकावं लागेल. अन्यथा तुमचं जगणं कठीण होईल. त्यामुळे मी अशा ट्रेंडसारख्या गोष्टी फार गांभीर्याने घेत नाही.” असं करीनाने म्हटलं आहे.
लालसिंग चढ्ढा हा सिनेमा येऊ घातलेला असतानाच अशा प्रकारे दोन्ही कलाकारांनी याबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. आमिर खानला हिंदू विरोधी ठरवत आम्ही त्याचा सिनेमा पाहणार नाही हे सांगत ट्विटरवर बॉयकॉट लालसिंग चढ्ढा हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. त्यानंतर आमिरने याबाबत समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तर त्याच्या पाठोपाठ आता अभिनेत्री करीना कपूरनेही या सगळ्यावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT