शरद पवारांबाबत वादग्रस्त कविता पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबईतल्या रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर केतकी चितळेला जामीन मंजूर केला.
ADVERTISEMENT
जामीन मंजूर झाला असला तरीही केतकी चितळेला घरी जाता येणार नाही, तिचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. शरद पवार यांच्याबाबत जी आक्षेपार्ह कविता केतकीने पोस्ट केली होती त्या प्रकरणी २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत केतकीला ठाणे येथील कारागृहातच रहावं लागणार आहे.
शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?
याआधी झालेल्या युक्तीवादात केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी अॅट्रोसिटी गुन्ह्यात लावण्यात आलेलं कलम योग्य नाही असा युक्तिवाद केला होता. तर केतकीच्या अॅट्रोसिटी जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील अमित कटारमवरे यांनी बाजू मांडली होती. केतकीला जामीन मिळाला आहे तरीही तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे कारण शरद पवारांविषयी तिने जी पोस्ट केली होती त्या प्रकरणी २१ जून ला सुनावणी होणार आहे.
केतकी चितळेच्या अटकेची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. महिला आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपींना नोटीस पाठवून या प्रकरणी सात दिवसात स्पष्टीकरण मागितलं आहे. केतकी चितळेने आपली अटक बेकायदेशीर आहे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. केतकी चितळेला १५ मे रोजी अटक करण्यात आली. शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट तिने फेसबुकवर पोस्ट केली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोस्टची पार्श्वभूमी काय?
मूळ पोस्ट अॅड. नितीन भावे या व्यक्तीची असून केतकीने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती. या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.
केतकी चितळेला २०२० मधल्या अॅट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मात्र शरद पवारांविषयीच्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सुनावणी बाकी आहे. त्यामुळे जामीन मिळूनही केतकीला तुरुंगातच रहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT