महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही राज्य सरकारसाठी चिंताजनक ठरत आहे. अमरावती आणि अकोला या भागांमध्ये जिल्हा प्रशासनाने १ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू रुग्णसंख्येत होत असलेली वाढ अजुनही कमी होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर व जवळच्या प्रतिबंधित क्षेत्रात ८ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
अकोल्यात १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत २ हजार ३७५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. २० फेब्रुवारीनंतरही रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून २६ तारखेपर्यंत १ हजार ३२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भातला पॉजिटीव्हीटी रेटही १० टक्क्यांच्या वर पोहचला आहे. त्यामुळे ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अकोला आणि प्रतिबंधीत क्षेत्रात लॉकडाउन वाढवणं गरजेचं असल्याचं मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलं आहे.
लॉकडाउनच्या काळात जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. तसेच या काळात नियमांचा भंग करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलंय.
दरम्यान, महाराष्ट्रासाठी टेन्शन वाढवणारी बातमी सलग तिसऱ्या दिवशी समोर आली आहे. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी ८ हजार २३३ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात ४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात ४ हजार ९३६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या १ कोटी ६१ लाख १२ हजार ५१९ नमुन्यांपैकी २१ लाख ३८ हजार १५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT