महाड: जंगलात सापडला महिला सरपंचाचा विवस्त्र मृतदेह, बलात्काराचा संशय

मुंबई तक

• 09:55 AM • 28 Dec 2021

मेहबूब जमादार, महाड: महाड तालुक्यातील एका गावच्या 42 वर्षीय सरपंच महिलेची निघृर्ण हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकून दिल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. तुडील-भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला लाकडं आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली आहे. गावातील एक […]

Mumbaitak
follow google news

मेहबूब जमादार, महाड: महाड तालुक्यातील एका गावच्या 42 वर्षीय सरपंच महिलेची निघृर्ण हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकून दिल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हे वाचलं का?

तुडील-भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला लाकडं आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली आहे. गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत लाकडांची मोळी अस्त्यावस्त दिसून आली. पण आजूबाजूला कोणीही दिसलं नाही. त्यामुळे तरुणाला काहीसा संशय आला.

यामुळे सदर तरुणाने परिसरात आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याला रस्त्यालगत जंगल भागात एक महिला गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली. अज्ञात इसमाने डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करुन तिची हत्या केली असल्याचं यावेळी उघड झालं. तसंच संबंधित महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने तिच्यावर अतिप्रसंग अथवा बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Crime: अवघ्या 3 वर्षाच्या पुतणीची काकूने केली हत्या, 5 दिवस मृतदेह ठेवलेला गव्हाच्या कोठीत

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महाडचे पोलीस अधिक्षक, तालुका पोलीस हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्यामुळे हत्येपूर्वी महिलेवर लैंगिक अत्याचार झाले असण्याची किंवा तसा प्रयत्न झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मात्र, या गोष्टीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन नजीकच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

दुसरीकडे ही हत्या नेमकी कोणी केली असावी आणि महिलेच्या हत्येमागचं नेमकं कारण काय या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत. दुसरीकडे राजकीय वैमनस्यातून तर ही हत्या झालेली नाही ना.. याचा देखील पोलीस तपास करत आहेत. आता या प्रकरणी नेमकी कोणाला अटक होणार याकडे सर्व गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महाडमधील अतिदुर्गम भागात काही वाड्या आणि गावं आहेत. याठिकाणी फारशी वस्ती नाही. बहुतेक जंगली भाग हा जास्त आहे. मात्र, असं असलं तरीही गावातील महिला या सरपण आणण्यासाठी नेहमीच जंगलात जातात. पण अशा पद्धतीने एका महिलेची हत्या करुन फरार झालेल्या आरोपीमुळे गावांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    follow whatsapp