मुंबईतले कामगार, मराठी बहुलभागाने आमि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राने शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षातला संघर्ष पाहिला. त्याच मुंबईने आज वेगळं चित्र पाहिलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. सीपीआयच्या नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात काहीही घडू शकतं कालचे शत्रू आज मित्र कसे होऊ शकतात हे पुन्हा समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
सीपीआयचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
अंधेरी पोटनिवडणूक जवळ आली आहे. त्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भाजप विरोधातल्या निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. भाकपच्या या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली राव यांचा समावेश होता. शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरेगांवकर उपस्थित होते.
सीपीआयचे नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राज्यात नवं समीकरण तयार होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेचं सीपीआयने कौतुक केलं आहे. हिंदुत्वाची आणि पक्षाची मांडणी ठाकरेंकडून नव्या पद्धतीने सुरू आहे. त्यात ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाईंची हत्या आणि शिवसेना
कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाईंची हत्या झाली. शिवसेनेच्या स्थापनेच्या आधी मुंबईत कामगारसंघटनांचा प्रभाव होता. या कामगार संघटना कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्वात काम करत होत्या. या सगळ्यात वर्चस्वाच्या लढाईत शिवसेना कम्युनिस्ट यांचा संघर्ष उभा राहिला. या टोकाच्या संघर्षातूनच कृष्णा देसाईंची हत्या झाली.
कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर शिवसेनेसह बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हत्येत हात असल्याचा आरोप झाला. मात्र बाळासाहेब ठाकरेंवरचे आरोप कोर्टात टिकले नाहीत. या हत्येनंतर कामगारांची मोठी संख्या असलेल्या आणि कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या परळ मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यात शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला. कम्युनिस्ट आणि शिवसेना यांचा संघर्ष हा त्या काळात टोकाला गेला होता. आज तेच कम्युनिस्ट नेते उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर आले होते.
ADVERTISEMENT