नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज 5 दिवसीय विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरमध्ये आगमण झाले. सकाळी विदर्भ एक्सप्रेसने ते नागपुरमध्ये आले. मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात आणि घोषणा देवून जंगी स्वागत केले. राज ठाकरे यांच्यां सोबत अविनाश जाधव, संदीप देशपांडे, प्रकाश महाजन आदी मनसेचे प्रमुख नेतेही उपस्थित आहेत.
ADVERTISEMENT
लहानग्याचा हट्ट पुरवून विदर्भ दौऱ्याची सुरुवात
दरम्यान, राज ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याची सुरुवात एका लहान नातवाचा हट्ट पुरवून झाली. राज ठाकरे यांचा चाहतावर्ग अबालवृद्धांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. याचाच काहीसा प्रत्यय आज नागपुरमध्ये आला. आपल्या लहान नातवाचा ठाकरेंच्या सहीचा हट्ट पुरविण्यासाठी थेट ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये एक आजी आणि संबंधित नातू पोहोचले. त्यावेळी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांनी देखील आजी आणि नातवाला भेटीचे आश्वासन दिले.
लहानग्या अद्वैत पत्की याने निश्चय केला होता की राज ठाकरे यांची भेट होईपर्यंत नाष्टा देखील करणार नाही. यानंतर राज ठाकरे यांचा नाष्टा झाल्यावर ते आपल्याला भेट देणार असल्याचा त्याला निरोप मिळाला आणि त्यानंतरच त्यानेही नाष्टा केला. यावेळी त्याने एका डायरीवर राज ठाकरेंसाठी एक खास संदेश देखील लिहून आणला होता. त्यावर ऑटोग्राफ घेणार असल्याचे त्याने सांगितले. यानंतर ठाकरे यांनीही अद्वैतला भेटून त्याचा हट्ट पूर्ण केला.
आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंचा विदर्भ दौरा :
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी आणि पक्षविस्तार यासाठी राज ठाकरे सध्या मैदानात उतरले आहेत. याचसाठी ते विदर्भ दौऱ्यावर आले असल्याचे पाहायला मिळते. या दौऱ्यात ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहेत. नुकतेच मनसेने सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा :
-
18 सप्टेंबर रोजी सकाळी रेल्वेने नागपुरमध्ये आगमन. 18 व 19 सप्टेंबर रोजी नागपूर येथील रविभवन येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक.
-
20 सप्टेंबर रोजी 1 दिवसीय चंद्रपूर दौरा
-
21 22 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय अमरावती दौरा. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक
-
22 सप्टेंबर रोजी अमरावतीहून मुंबईला रवाना.
ADVERTISEMENT