महिला दिनाचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व महिलांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महिलांनी कुणाच्याही हातचं प्यादं बनू नये असंही सुचवलं आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र ट्विट केलं आहे. त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जातं आहे. आपण पाहुया राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
राज ठाकरेंचं पत्र
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात हा महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.
आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, बांधवांनो महिलांबद्दल जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवाल तितके शिवराय तुमच्यावर प्रसन्न होतील. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे.
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो. तुम्हाला कुणीही सक्षम करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःच सक्षम आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धिला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागला तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.
राजकारण किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे, तुम्ही कुणाच्याही हातचं प्यादं बनून राहण्याची गरज नाही. तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलू शकता.
बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा!
आपला नम्र
राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र पोस्ट केलं आहे. राज ठाकरेंनी लिहिलेलं हे पत्र चांगलंच चर्चेत आहे.
ADVERTISEMENT