मेट्रो-३ चं कारशेड ‘आरे’मध्येच होणार! ठाकरे सरकारने दिलेली स्थगिती शिंदे सरकारने उठवली

मुंबई तक

• 08:30 AM • 21 Jul 2022

देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत येताच मुंबईतील मेट्रो ३ च्या कारशेडबद्दलची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता मेट्रो ३ च्या आरेतील कारशेडच्या कामाला ठाकरे सरकारने दिलेली स्थगिती उठवत फडणवीसांनी ठाकरेंना झटका दिला. आरे येथे कारशेड बनवण्याच्या कामाला सरकारने परवानगी दिली आहे. २०१४ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुंबई मेट्रो-३ लाईनच्या कारशेडसाठी आरेतील जागा निश्चित केली […]

Mumbaitak
follow google news

देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत येताच मुंबईतील मेट्रो ३ च्या कारशेडबद्दलची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता मेट्रो ३ च्या आरेतील कारशेडच्या कामाला ठाकरे सरकारने दिलेली स्थगिती उठवत फडणवीसांनी ठाकरेंना झटका दिला. आरे येथे कारशेड बनवण्याच्या कामाला सरकारने परवानगी दिली आहे.

हे वाचलं का?

२०१४ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुंबई मेट्रो-३ लाईनच्या कारशेडसाठी आरेतील जागा निश्चित केली होती. मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी जागा निश्चित केल्यानंतर पर्यावरण प्रेमी, वन्यप्राणी संघटनांसह अनेकांनी याला विरोध केला होता.

आरेतील कारशेडबाबत आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेनं याविरोधात भूमिका घेतली होती. मात्र, फडणवीस सरकारने २०१९ मध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी वृक्षांची कत्तल करत काम सुरूच ठेवलं. त्यामुळे मोठं आंदोलन त्यावेळी झालं होतं.

मात्र, २०१९ मधील निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार अस्तित्वात आलं. मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेताच उद्धव ठाकरेंनी आरेतील कारशेडचं काम थांबवलं होतं.

त्यानंतर मेट्रो ३ कारशेड आरेतून कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, कांजूरमार्ग येथील जागेवरून राज्य-केंद्र असा संघर्ष सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं.

आरेतील मेट्रो कारशेड, आदेशात काय म्हटलंय?

मुंबई मेट्रो लाईन ३ (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) हा प्रकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. केंद्राच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने १७ मार्च २०२२ मध्ये मुंबई मेट्रो लाईन ३ करीता कारशेड डेपो उभारण्यासाठी आणि प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

२९ नोव्हेंबर २०१९ रोजी आरे दुग्ध वसाहत येथील कारशेड डेपो उभारणीस दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे. आरे कारशेड येथे डेपो उभारण्यासंदर्भात सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करण्यात यावं, तसेच तेथील जैवविविधतेला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी, असं स्थगिती उठवणाऱ्या आदेशात म्हटलेलं आहे.

सोमय्या यांनी मानले शिंदे-फडणवीस यांचे आभार

“शिंदे-फडणवीस सरकारने आरे कारशेडवरील स्थगिती मागे घेतली आहे. आरे कारशेडचे काम जलदगतीने सुरू होईल. मला विश्वास आहे येत्या वर्षभरात कुलाबा-सिप्झ मेट्रो रुळांवरून धावेल. समस्त मुंबईकरांच्या वतीने मी शिंदे आणि फडणविसांचे आभार मानतो!,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp