नाशिकमध्ये व्यापाऱ्याला स्वस्तात सोनं मिळवून देण्याचं अमिष दाखवत ७५ लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. व्यापारी इश्वर गुप्ता यांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच दाखल केलेल्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ आरोपींना अटक केली असून या प्रकरणातला मुख्य सूत्रधार फरार आहे.
ADVERTISEMENT
दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी मदन साळुंखे आणि संतोष यांनी व्यापारी गुप्ता यांची भेट घेऊन कस्टममध्ये अडकलेले अडीच किलो सोनं असल्याचं सांगितलं. हे सोनं बाहेर बाजारात विकता येणार नसल्यामुळे चालू दराच्या तुलनेत हे सोनं स्वस्त दरात मिळवून देण्याचं सांगितलं. आरोपींनी गुप्ता यांच्याशी बोलत असताना प्रतितोळा ३० हजार रुपये एवढा भाव निश्चीत केला. गुप्ता यांचा विश्वास बसवा यासाठी त्यांनी सोन्याचे काही तुकडेही गुप्तांना दाखवले.
गुप्ता यांनीही आरोपींनी दाखवलेले सोन्याते तुकडे सोनाराकडून खरे आहेत की नाही याची खात्री करुन घेतली. यानंतर आरोपींनी सोनं खरेदी करण्यासाठी गुप्ता यांना ७५ लाखांची रोकड घेऊन बोलावलं. आरोपींपैकी एक आरोपी गुप्ता यांना आडमार्गे मखमलाबाद रोडला घेऊन गेला. मात्र इथे पोहचल्यानंतर आरोपींनी पैसे घेऊन सोनं न देताच तिकडून पोबारा केला. यानंतर गुप्ता यांनी तात्काळ म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT