राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना झाला आहे. त्यांनी स्वतः यासंदर्भातली माहिती ट्विट करून दिली आहे. याआधी त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोना झाला होता. आता शरद पवार यांनाही कोरोना झाला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे शरद पवार यांचं ट्विट?
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजीचं काहीही कारण नाही. मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार घेतो आहे. जे कुणी माझ्या संपर्कात गेल्या काही दिवसांमध्ये आले होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसंच त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांनी योग्य ती वैद्यकीय खबरदारी घ्यावी’ अशी विनंती करणारं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.
कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये आहेत असंही कळतं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत करोना परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार मैदानात उतरताना दिसले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिवांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर बराच काळापासूनच सुरु असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठीही शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सोबत घेऊन एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याशिवाय, शरद पवार राज्यातील करोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातही होते.
रायगडमध्ये शाळेत कोरोनाचा उद्रेक; दोन शिक्षकांसह 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT