भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण वाढत आहेत. अशातच काही लोकांना म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी होण्याची भीती सतावते आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे दुर्मिळ प्रकारचं इनफेक्शन अनेक लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलं होतं. म्युकरमायकोसिस, ऑर्गन डिसफंक्शन यावर वेळेवर उपचार न होऊ शकल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. नाकावाटे सायन आणि फुफ्फुसांपर्यंत हा संसर्ग पोहचतो असं त्यावेळी करण्यात आलेल्या अभ्यासात लक्षात आलं होतं.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे आलेल्या दुसऱ्या लाटेत हाय ब्लड शुगर असणाऱ्यांना आणि दीर्घकाळ स्टेरॉईड्सवर ठेवण्यात आलेल्या रूग्णांना ब्लॅक फंगसचा धोका अधिक होता हेदेखील पाहिलं गेलं. तसंच प्रतिकार शक्ती कमी असलेले लोक, हृदय किंवा इतर अवयव ट्रान्सप्लांट झालेले लोक, दीर्घकाळ व्हेटिंलेटरवर असलेले रूग्ण यांनाही ब्लॅक फंगसचा धोका जास्त होता.
काय आहेत म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीची लक्षणं?
सर्दीमुळे नाक बंद होणं किंवा ना वाहू लागणं, गालाच्या हाडांमध्ये वेदना, चेहऱ्याच्या एका भागात वेदना, सुन्नपणा जाणवणं किंवा सूज येणं, नाकाचा वरचा भाग काळा पडणं किंवा त्याचा रंग बदलणं, दात सैल होणं, ब्लर व्हिजनची समस्या, छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही सगळी ब्लॅक फंगसची लक्षणं आहेत.
काही दिवसांपूर्वीच ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेत मुंबईत एका 70 वर्षीय महिलेला ब्लॅक फंगस झाल्याचं आढळून आलं. ५ जानेवारीला या महिलेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 12 जानेवारीला ब्लॅक फंगसची लक्षणं त्या महिलेला जाणवू लागली. यानंतर या महिलेला मुंबईतल्या वोक्हार्ट रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
काळी बुरशी आजाराची लक्षणं, उपचाराबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
वोक्हार्ट रूग्णालयाचे डॉ. हनी सावला यांनी आज तकशी बोलताना हे सांगितलं की या महिलेला १२ जानेवारीला आमच्याकडे दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांची शुगर 532 च्या वर गेली होती. त्यामुळे त्यांना तातडीने डायबिटिक किटोएसिडोसिस ट्रिटमेंटवर ठेवण्यात आलं. गेल्या दहा दिवसांपासून त्या मधुमेहाचं औषध घेत नव्हत्या असंही त्यांच्या घरातल्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांना तीन दिवसांनी गालाच्या हाडांमध्ये दुखणं, चेहऱ्यावर डाव्या बाजूला सूज ही म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसू लागली.
डॉ. सावला यांनी सांगितलं की त्यांना ब्लॅक फंगसची लक्षणं जाणवू लागल्यानंतर आम्ही तातडीने डिब्रिडिमेंट सर्जरी केली. आता त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सध्या अँटी फंगल्स औषधं देण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत ब्लॅक फंगस किंवा म्युकरमायकोसिसचा धोका मोठ्या प्रमाणावर जाणवत नाही असंही डॉ. सावला यांनी म्हटलं आहे.
मुंबईतल्या मसीना रूग्णालयाच्या डिसिज एक्सपर्ट डॉ. तृप्ती गिलाडा यांनी म्हटलं आहे की म्युकरमायकोसिस दीर्घकाळ रूग्णालयात राहणारे रूग्ण, गंभीर लक्षणं असलेले कोव्हिड रूग्ण, जास्त काळ स्टेरॉईडवर असेले रूग्ण यांना होतो. आता सध्या तरी ब्लॅक फंगसचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत नाहीत, मात्र ब्लॅक फंगसचे रूग्ण वाढणार नाहीत हे सांगणं आत्ता कदाचित घाईचं ठरेल असंही त्यांचं म्हणणं आहे.
फरीदाबाद येथील अमेरी हेल्थ एशियन रूग्णालयाचे डिसिज स्पेशालिस्ट डॉ. चारूदत्त अरोरा यांनी सांगितलं की ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या कोरोना रूग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचं प्रमाण अल्प आहे. कारण ओमिक्रॉनची लक्षणं ही अत्यंत मध्यम किंवा हलक्या स्वरूपाची आहेत. यावर उपचार करत असताना रूग्णालयात दाखल करणं, ऑक्सिजन सपोर्ट किंवा स्टेरॉईड देणं हे सगळं कमी रूग्णांच्या बाबत होतं आहे त्यामुळे ब्लॅक फंगसचं प्रमाणही कमी आहे.
ADVERTISEMENT