नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार पार पडला पण बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचं मंत्रिपद (Minister) हुकलं असल्याने मुंडे भगिनी पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याचबाबत विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्रातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये (Nashik) एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
‘प्रीतम मुंडे या नाराज आहेत असं कोणी सांगितले? कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका. भाजपमध्ये सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. त्यामुळे प्रीतम मुंडे या अजिबात नाराज नाही.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर फारसं भाष्य करणं टाळलं आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेत असताना पंकजा आणि प्रीतम या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. परंतु बुधवारी दुपारपर्यंत प्रीतम मुंडे यांचं नाव मागे पडलं. त्यातच काही प्रसारमाध्यमांनी पंकजा मुंडे दिल्ली असल्याच्या बातम्या चालवल्या. यावर स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे यांनी ट्वीट करुन स्पष्ट केलं की, प्रीतम आणि मी मुंबईतील निवासस्थानी आहोत.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला 24 तास उलटून गेलेले असताना पंकजा किंवा प्रीतम मुंडे या दोघी भगिनींनी अद्यापही कोणालाही शुभेच्छा देखील दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
राणेंना मंत्रिपद आणि युतीची शक्यता
दरम्यान, याचवेळी नारायण राणे यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे शिवसेना-भाजपच्या युतीला पूर्णविराम मिळाला आहे का? असा प्रश्न फडणवीस यांना केला असता त्यांनी म्हटलं की, ‘एकतर चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या सुरु असतात. नारायण राणे यांना मंत्री बनवत असताना त्यांच्या क्षमतेचा विचार केला आहे. इतर कोणताही विचार केला नाही.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.
‘मी काही ईडीचा प्रवक्ता नाही’
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरु केली आहे. खडसेंनी असा आरोप केला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘या संदर्भात ईडी बोलायचे आहे ते बोलेल, मी ईडीचा प्रवक्ता नाही. भारतीय राजकारणात अशा प्रकारचे काम करण्याची कोणतीही प्रथा नाही.’ असं म्हणत त्यांनी खडसेंवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
Cabinet Expansion : प्रीतम मुंडेंचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे, पंकजा यांच्या ट्विटमुळे चित्र स्पष्ट?
फडणवीस यांनी नाशिकच्या परिवहन सेवेचे उदघाटन केले. यावेळी म्हटलं की आनंद आहे की, ‘अतिशय अत्याधुनिक प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टम नाशिकला देत आहोत. ही अजून डेव्हलप करायला लागणार आहे. महानगपालिकेने 50 बसेस केंद्र सरकारकडे मागितल्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु निओ मेट्रो आणि बस सिस्टम या दोन्ही सुरु झाल्यानंतर एका आधूनिक शहरात नाशिकचे रुपांतर होईल.
ADVERTISEMENT