मुंबई: राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं असल्याचा दावा करत भाजपने त्यांचं मत रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत जितेंद्र आव्हाड हे मात्र प्रचंड संतापले दिसून आले. भाजपने केलेल्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली. तसंच भाजपविरोधाता संतापही व्यक्त केला.
ADVERTISEMENT
भाजपच्या ‘त्या’ आरोपावर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
‘सगळे चॅनल्स गेले साडे चार तास जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर आक्षेप अशा बातम्या देत आहेत. हे ऐकून-वाचून मी स्वत: संभ्रमात पडलो होतो आणि महाराष्ट्राला हे ज्ञात व्हावं की, मी काय केलं आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. मी साधारण बारा साडेबारा वाजता विधानसभेत पोहचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तिथे मला जे सांगण्यात आलं होतं ते ऐकून मी वर गेलो. तिथे मतदान केलं.’ असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
‘मतदान केल्यानंतर माझ्या पक्षाचे जे एजंट होते त्या एजंटला मतदान दाखवायचं असतं ती प्रक्रिया असते. मी असा पाठमोरा होतो. कागद असा माझ्या छातीवर होता. जो दाखवायचा असतो तो कॅमेरा माझ्या मागे होता. मी तिथे हसलो थोडासा त्याला एक वेगळं कारण होतं. ती मतदान पत्रिका मी बंद केली माझ्या खिशात ठेवली मी बाहेर आलो.’
‘मतदानाच्या पेटीकडे गेलो मतपत्रिका टाकली आणि मी बाहेर निघून आलो. त्यानंतर मी गेटवर आलो तोवर माझ्यावर कोणताही आक्षेप आला नव्हता. त्यानंतर अचानक मला तुमच्याकडून समजलं की, माझ्यावर आक्षेप आला आहे.’ अशी संपूर्ण प्रक्रिया यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना सांगितली.
‘मी जी क्रिया केली आहे. जी मतदानाची क्रिया आहे त्यात माझ्याकडून काही चूक झालेली आहे ज्यात माझं मत बाद व्हावं असं मला तरी कुठलाही गुन्हा वाटत नाही. उगाच महाराष्ट्रासमोर हे जायला नको की, आम्ही काही वेगळं केलंय काही चुका केल्या आहेत. तर तसं अजिबात नाही. आता असं आहे महाराष्ट्राला कळत असेल की, हे काय घडतंय. यामध्ये कारण नसताना हे खेळ लांबवर घेऊन जायचं हे जे काही चाललं आहे ते वेदनादायी आहे.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला.
‘आम्ही सुद्धा 22-23 वर्ष आमदार आहोत. उगाच कारण नसताना हे असे रडीचे डाव टाकायचे. माझ्या मताप्रमाणे की, माझ्या हातून मतदान करताना कोणतीही चूक झालेली नाही. माझं मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचं असतं नियमाप्रमाणे.. जर मी ते मतदान दाखवलं नाही तर मला माझा पक्ष निलंबित करु शकते सहा वर्षासाठी आणि माझं राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं. त्यामुळे नियमानुसार मी माझी क्रिया केली माझ्या माणसाला मतदान दाखवलं.’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राज्यसभा निवडणूक: आमदार आव्हाड-ठाकूर-कांदे खरंच चुकले?, भाजप म्हणतं हो-हो!
‘मी जी माहिती घेतली.. अगदी समोरच्या गोटातून देखील माहिती घेतली. ते म्हणाले व्हीडिओमध्ये तुम्ही काही केल्याचं दिसत नाही. त्यामुळे या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी मी समोर आलं आहे.’
‘आम्ही कुठेही चुकलेलो नाही हे स्पष्टपणे महाराष्ट्राला सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. मला माहित नाही की, हे का होतंय ते.. पण माझ्या हृदयाला माहिती आहे की, मी काय केलंय ते आणि माझ्या रक्तात गद्दारी नाहीए. निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच मी क्रिया केली आहे.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आपला संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT