केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याचं म्हटलं आहे.
‘भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याला सांड म्हणणं म्हणजेच दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसत आहे. दानवे यांची बुद्धी नेहमीच भ्रष्ट झालेली असते’, अशी टीका राऊत यांनी केली.
‘या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. पंतप्रधान मोदी यांना बैल म्हणणं म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी’, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
‘तुम्ही लाचार होऊन शिवसेनेशी द्रोह केला, पण…’; नारायण राणेंना खासदार राऊतांचं प्रत्युत्तर
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे विधान केलं. ‘जनतेमध्ये काय काम केलं हे राहुल गांधी यांनी समजून सांगावं. मी काल बदनापूरमध्ये भाषण करत असताना जनतेतून काहीजणांनी मला प्रश्न विचारले. मी त्यांना शेतीमधील उदाहरण दिलं. मी त्यांना सांगितलं की, शेतीमध्ये दोन प्रकारचे बैल असतात. एक काम करणारा बैल आणि दुसरा काम न करणारा बैल.’
‘शेतकऱ्यांनी मला विचारलं की, काम करणारा बैल हा आम्हाला समजतो; पण न काम करणारा बैल कोणता? तेव्हा मी त्यांना सांगितलं की, सांड बैल हा न काम करणारा बैल असतो.’
‘एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे काम न करणारे सांड बैल आहेत. बैलाचे दोन प्रकार असतात; काम करणारा बैल आणि काम न करणारा बैल. सांड बैल म्हणजे न काम करणारा.’
‘राहुल गांधी हे अशाप्रकारचे बैल आहे की, ज्यांना देवाच्या नावानं गावात मोकळं सोडलं जातं. हा बैल काही कामाचा नसतो. जर हा बैल एखाद्या शेतात घुसला तर त्याच्या सगळ्या पिकाची नासाडी करतो. तरी देखील लोकं त्याला काही करत नाही. त्याला माफ करतात. असंच राहुल गांधीसोबत केलं जात आहे’, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.
ADVERTISEMENT