रिसेप्शनिस्ट ते सुपर सीएम! बाळासाहेब ठाकरेंच्या सुनबाई स्मिता यांच्याविषयी माहित आहे का?

मुंबई तक

• 12:01 PM • 27 Jul 2022

२१ जूनला शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या बंडानं थेट ठाकरेंनाच चॅलेंज देण्यात आलं. त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाकरेंच्या सुनबाई भेटायला गेल्या. स्मिता ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतली. ठाकरेंच्या या सुनबाई जेव्हा जेव्हा प्रकाशझोतात येतात तेव्हा तेव्हा राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा होते. आता आपण जाणून घेऊ की या स्मिता ठाकरे कोण? उद्धव ठाकरेंशी त्यांचा वाद […]

Mumbaitak
follow google news

२१ जूनला शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या बंडानं थेट ठाकरेंनाच चॅलेंज देण्यात आलं. त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाकरेंच्या सुनबाई भेटायला गेल्या. स्मिता ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतली. ठाकरेंच्या या सुनबाई जेव्हा जेव्हा प्रकाशझोतात येतात तेव्हा तेव्हा राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा होते. आता आपण जाणून घेऊ की या स्मिता ठाकरे कोण? उद्धव ठाकरेंशी त्यांचा वाद काय आणि त्यांना सुपर सीएम का म्हटलं जायचं?

हे वाचलं का?

बाळासाहेब ठाकरेंची सून असलेल्या स्मिता ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटल्या

बाळासाहेब ठाकरेंच्या सुनबाई स्मिता ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंगळवारी 27 जुलैला भेट घेतली. शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना ठाकरेंच्या ठाकरेपणावरच प्रश्न निर्माण झालेले असताना शिंदेंशी केलेल्या हातमिळवणीमुळे स्मिता ठाकरे चर्चेत आल्या आहेत.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. ते मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आता मी राजकारणात नाही, समाजसेवा करतेय, असं स्मिता ठाकरेंचं म्हणणं आहे. पण कधीकाळी स्मिता ठाकरेंची बाळासाहेबांच्या वारसदार म्हणून चर्चा व्हायची. मग ठाकरे घराण्यात येण्याआधी स्मिता काय करायच्या?

स्मिता ठाकरे या रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायच्या…

स्मिता ठाकरे करिअरच्या सुरवातीला पासपोर्ट कार्यालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायच्या. इथेच त्यांची काही कामानिमित्ताने जयदेव ठाकरेंशी ओळख झाली. आणि याच ओळखीतून 1987 मध्ये स्मिता, ठाकरेंच्या सुनबाई झाल्या. स्मिता चित्रे, स्मिता ठाकरे झाल्या. स्मिता या जयदेव ठाकरेंच्या दुसऱ्या पत्नी.

जयदेव म्हणजे उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू. पण उद्धव ठाकरे नावारूपाला येण्याआधी याच स्मिता ठाकरेंकडे बाळासाहेबांचा वारसदार म्हणून बघितलं जायचं.

लग्नानंतर दहा वर्ष स्मिता पडद्याआडच राहिल्या. १९९६ मध्ये ठाण्यातल्या एका जिमच्या उद्घाटनावेळी बाळासाहेबांसोबत त्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या. इथूनच स्मिता ठाकरे नावाभोवती वलय निर्माण व्हायला सुरवात झाली. याच काळात राज्यात युतीचं सरकार सत्तेत होतं. मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांकडे होता. पण सुनबाईंच्या नावाभोवती ‘सुपर सीएम’चं वलय निर्माण झालं होतं. स्मिता ठाकरेंच्या शब्दाला मोठं मोल आलं. नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, ते स्मिता ठाकरेंच्या शिफारसीनंच असंही अनेकजण सांगतात.

पण जसजशी बाळासाहेबांच्या वारसदाराची चर्चा सुरू झाली, तसं ठाकरे कुटुंबातच दोन गट पडल्याचं समोर आलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्येच चढाओढ लागली. स्मिता ठाकरेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कोणापासून लपून राहिल्या नव्हत्या. सुनबाईंच्या एंट्रीनं वारशाचा त्रिकोण तयार झाला. पण नंतर उद्धव ठाकरेंच्या हातात सगळं नेतृत्व आलं आणि वारसदाराचा प्रश्नच मिटला.

तेव्हा ठाकरे रिमोट कंट्रोलसारखं पडद्यामागून सत्तासूत्रं हाताळतात, असं म्हटलं जायचं. पण स्मिता ठाकरेंना प्रत्यक्ष राजकारणात उतरायचं होतं. २००८ चा काळ असेल. तेव्हा स्मिता ठाकरेंना राज्यसभेचं तिकिट हवं होतं. पण तिकीट मिळालं भारतकुमार राऊतांना. सुनबाईंच्या महत्त्वाकांक्षांचे पंख आपोआप कापले गेले. यानंतरच स्मिता ठाकरेंनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठीही चाचपणी केली. पण स्मिता ठाकरेच राजकीय पटलावरून गायब झाल्या.

स्मिता ठाकरेंचा बॉलिवूडमध्ये दबदबा

आडनावातल्या ठाकरेमुळे स्मिता यांचा राजकारणासोबतच बॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण झाला. स्मिता ठाकरेंनी पार्टी आयोजित केलीय म्हटलं की झाडून सगळे सुपरस्टार यायचे, एवढं वलय तयार झालं होतं. १९९९ मध्ये हसीना मान जायेगी सिनेमाच्या निर्मितीतून त्यांचीं सिनेसृष्टीतही एंट्री झाली. काही टीव्ही मालिका आणि सिनेमेही बनवले.

स्मिता ठाकरेंची राजकीय आणि सिने कारकीर्द जाणून घेतल्यानंतर थोडं कौटुंबिक घडामोडीबाबतही सांगता येईल.

जयदेव आणि स्मिता ठाकरेंमध्ये दहा वर्षांतच दुरावा निर्माण झाला. स्मिता ठाकरेंना राहुल आणि ऐश्वर्य अशी दोन मुलं आहेत. राहुलच्या नावानंच स्मिता ठाकरेंनी राहुल प्रॉडक्शन सुरू केलं होतं. राहुलनेही 2011 मध्ये आलेल्या ‘राडा रॉक्स’ सिनेमाचं दिग्दर्शन करून सिनेसृष्टीत एंट्री केली होती.

सध्या स्मिता ठाकरे राजकारण किंवा सिनेमात अँक्टिव नाहीत. पण मुक्ती फाऊंडेशन या एनजीओच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.

    follow whatsapp